मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी २५ व्या आरोपीला अकोला येथून अटक करण्यात आली. मुंबई आणि अकोला पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सलमानभाई इक्बालभाई वोहरा असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर हत्येतील आरोपींसह शूटरला आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. त्याच्यासह पंजाबवरुन टान्झिंडवर मुंबईत आणलेल्या आकाशदिप कारजसिंग गिल या दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात गुरुवार २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या महिन्यांत दसर्याच्या दिवशीच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे असून याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी शिवकुमारसह त्याचे चार सहकारी १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस तर इतर सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींच्या चौकशीतून या कटातील साखळीचा पर्दाफाश पोलिसांना यश आले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पंजाब येथून पोलिसांनी आकाशदिप या आरोपीला अटक केली होती. त्याची टान्झिंड रिमांड घेतल्यानंतर रविवारी त्याला पुढील चौकशीसाठी आणण्यात आले. ही कारवाई ताजी असताना मुंबई पोलिसांच्या पथकाने अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने या गुन्ह्यांतील आणखीन एक वॉण्टेड आरोपी सलमानभाई वोहरा याला अकोला येथून अटक केली.
सलमानभाई हा मूळचा गुजरातच्या आनंद, पेटलाद, सेवा मशिदीजवळील अर्बन पार्कचा रहिवाशी आहे. बाबा सिद्धीकी यांच्या हत्येसाठी आर्थिक व्यवहार झाला होता. हा व्यवहार सलमानभाईच्या बँक खात्यातून झाला होता. मे २०२४ रोजी त्याच्याच आनंद शाखेच्या एका बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर त्याने ती रक्कम नरेशकुमार सिंग, रुपेश मोहोळ आणि हरिशकुमार यांना दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. कटाच्या अंमलबजाणीसाठी या आर्थिक मदतीचा वापर झाला होता. त्यामुळे आकाशदिपसह सलमानभाई या दोघांनाही रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेने या कटातील आर्थिक व्यवहाराचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश येणार आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.