मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – गेल्या २४ तासांत शहरात वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अंधेरी आणि भांडुप परिसरात घडली. रेहमान गुफरान खान आणि विशाल शंकर पवार अशी जखमी झालेल्या दोघांची नावे असून त्यांच्यावर नवकार व कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सहार आणि भांडुप पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांतील आरोपी नंदन राजेंद्रप्रसाद सिंग याला सहार पोलिसांनी अटक केली तर दुसर्या गुन्ह्यांतील आरोपी पळून गेल्याने त्याचा भांडुप पोलिसांकडून शोध सुरु आहे.
आसमा गुफरान खान ही महिला अंधेरीतील मरोळ पाईपलाईन, द ग्रेट इंदिरानगर परिसरात राहते. तिचा २२ वर्षांचा रेहमान हा मुलगा आहे. नंदन सिंग हा त्याच्या परिचित असून ते दोघेही मित्र आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता नंदनने रेहमानला गाडीने रामलिला मैदानापर्यंत सोडण्यास सांगितले. रामलिला मैदानाजवळ आल्यानंतर त्याने जुन्या वादातून त्याच्यावर फरशीचा ब्लॉमकसह अन्य घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात रेहमान हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुरफानवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी आसमा खान हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या नंदन सिंग याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील नंदन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात सहाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरी घटना शनिवारी सकाळी सात वाजता भांडुपच्या एलबीएस मार्ग, हॉटेल पंचरत्न बार ऍण्ड रेस्ट्रॉरंटजवळील गल्लीत घडली. विशाल पवार हा डिलीव्हरी बॉयचे काम करत असून तो भांडुप परिसरात राहतो. शनिवारी तो पार्सल घेण्यासाठी जात होता. यावेळी पंचरत्न बारजवळ एका अज्ञात व्यक्तीने त्याच्याकडे लिफ्ट मागितली. त्यानंतर त्याने त्याच्या कानाच्या दिशेने तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात विशाल हा जखमी झाला होता. त्यामुळे त्याला नवकार या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला होता. हल्ल्यानंतर आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.