मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच परिचित ७५ वर्षांच्या वयोवृद्धाने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना परळ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी वयोवृद्धाविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
३४ वर्षांची तक्रारदार महिला ही परळ परिसरात राहते. याच इमारतीमध्ये आरोपी वयोवृद्ध राहतो. शुक्रवारी रात्री आठ वाजता तिची तेरा वर्षांची मुलगी तिची हाफ पॅट अल्टरसाठी गेली होती. यावेळी आरोपीने माप घेण्याचा बहाणा करुन तिच्याशी अश्लील चाळे केले होते. तसेच तिने विरोध करुनही त्याने तिच्या गालावर आणि ओठांवर चुंबन घेऊन तिचा विनयभंग केला होता. या प्रकारानंतर ती प्रचंड घाबरली आणि पळून गेली. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. त्यानंतर तिने काळाचौकी पोलीस ठाण्यात आरोपी वयोवृद्धाविरुद्ध तक्रार केली होती. या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. आरोपी वयोवृद्धासह विकलांग असल्याने त्याला वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडे हजर करुन पुढील कारवाईसाठी पुन्हा काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वरिष्ठांच्या आदेशानंतर पुढील कारवाईची तजवीज ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.