विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा ईमेल सायबर ठगाकडून हॅक
ईमेलवरुन आमदारावर कारवाईचा राज्यपालांना मेलने खळबळ
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मार्च २०२४
मुंबई, (प्रतिनिधी) – विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा वैयक्तिक ईमेल अज्ञात सायबर ठगाने हॅक करुन हॅक केलेल्या ईमेलवरुन राज्यपाल रमेश बैस यांना मेल पाठविण्यात आला आहे. या मेलमध्ये सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्यपाल कार्यालयातून संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी राहुल नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीवरुन मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात सायबर ठगाविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत मरिनड्राईव्ह पोलिसांसह स्थानिक सायबर सेल पोलिसांना संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर सायबर सेल पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष असून त्याचा वैयक्तिक ईमेल आयडी आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा ईमेल आयडी हॅक अज्ञात सायबर ठगाकडून हॅक करण्यात आला होता. त्यानंतर त्याच ईमेलवरुन राज्यपाल रमेश बैस यांना एक मेल पाठविण्यात आला होता. या मेलमघ्ये काही आमदार सभागृहात नीट वागत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. विधानसभेत राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशादरम्यान झालेल्या वादाचा संदर्भ देत आमदार दादा भुसे यांच्यासह अन्य एका सत्ताधारी आमदाराला या मेलवरुन टार्गेट करण्यात आले होते. हा मेल प्राप्त होताच त्याची राज्यपाल कार्यालयातून राहुल नार्वेकर यांच्याकडे शहानिशा करण्यात आली होती. यावेळी त्यांनी असा कुठलाही मेल राज्यपाल रमेश बैस यांना पाठविला नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्याची शहानिशा केली असता अज्ञात सायबर ठगाने त्यांचा ईमेल हॅक करुन नंतर राज्यपालांना मेल पाठविल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या वतीने मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी १७०, ४१९ भादवी सहकलम ६६ क, ६६ ड आयटी कलमांतर्गत अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास सायबर सेल पोलिसांना सोपविण्यात आला आहे. त्यामुळे सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षांचा ईमेल हॅक करुन राज्यपालांना पाठविण्यात आलेल्या मेलमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.