दैनदिन खर्चासह पत्नीच्या गरजा भागविण्यासाठी तो बनला चोर
नोकरीच्या आमिषाने मोबाईल पळविणारा सराईत गुन्हेगार गजाअड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – नोकरीच्या आमिष दाखवून काल करण्यासाठी घेतलेला मोबाईल चोरी करुन पळून जाणार्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद कासिम मोहम्मद जलाल शेख ऊर्फ आतिक असे या ४१ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध मोबाईल चोरीच्या अनेका गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याकडून चोरीचे अठरा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आतिकने दोन लग्न केले होते, दैनदिन खर्चासह पत्नीच्या गरजा भागविण्यासाठी तो चोर बनल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्या अटकेने मोबाईल चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
९ जुलैला यातील तक्रारदार कामानिमित्त मालाड परिसरात आले होते. तिथेच त्याची आतिकसोबत ओळख झाली होती. त्याने त्याला कपड्याच्या दुकानात नोकरीवर ठेवतो असे सांगितले. त्याचा विश्वास संपादन केल्यानंतर कॉल करण्यासाठी त्याने त्याचा मोबाईल घेतला होता. मोबाईलवर बोलता बोलता तो गायब झाला होता. नोकरीच्या आमिषाने आरोपीने त्याचा मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्याने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. मालाडच्या हद्दीत अशाच इतर काही गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे त्याची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. याबाबत मालाड पोलिसांसह स्थानिक पोलिसांना आरोपीच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते.
या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे, पोलीस हवालदार राजेश तोडवलकर, संतोष सातवसे, जयदिप जुवाटकर, अमीत गावंड, स्वप्नील काटे, पोलीस शिपाई महेश डोईफोडे, अविनाश जाधव, वैभव थोरात यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने आतिकला मालाडच्या एस. व्ही रोड परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. अशा प्रकारच्या गुन्ह्यांतील तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याने आतापर्यंत अनेकांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडील मोबाईल घेऊन पलायन केले होते. त्याच्याकडून पोलिसांनी विविध कंपनीचे अठरा चोरीचे मोबाईल जप्त केले आहे. त्यापैकी मालाड पोलीस ठाण्यातील चार मोबाईल समावेश आहे.
त्याच्या अटकेने या चारही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने इतर चौदा मोबाईल मुंबईसह इतर ठिकाणाहून चोरी केल्याचे उघडकीस आले असून या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध मालाड, मरिनड्राईव्ह, कुलाबा, खार, वांद्रे आणि ठाण्यातील नवपाडा, डोबिंवली पोलीस ठाण्यात पंधराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचा लवकरच इतर पोलिसांकडून ताबा घेतला जाणार आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.