बॉल बेरिंगच्या ६२ लाखांचा पेमेंटचा अपहार करुन फसवणुक
पुण्याच्या व्यावसायिकाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बॉल बेरिंगच्या सुमारे ६२ लाखांच्या मालाचे पेमेंटचा अपहार करुन एका व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार पायधुनी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्याचा व्यावसायिक असलेला राजेंद्र थोरात याच्याविरुद्घ पायधुनी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्याच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कल्पेश निरंजन शहा हे व्यावसायिक असून त्यांचा बॉल बेरिंगचा व्यवसाय आहे. सध्या ते त्यांच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहतात तर त्यांचा पायधुनी येथे गौतम इंटरप्रायजेस नावाचे एक कार्यालय आहे. एप्रिल २०२२ रोजी त्यांची राजेंद्र थोरात याच्याशी ओळख झाली होती. राजेंद्र हा पुण्याच्या भोसरीचा व्यावसायिक असून त्याची बालाजी इंजिनिअरिंग कार्पोरेशन नावाची कंपनी आहे. त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांनी त्यांच्यासोबत व्यवहार सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अल्पावधीत त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळे त्यांनी त्याला एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत ९३ लाख ३३ हजार ६९० रुपयांचे बॉल बेरिंगचा माल पाठविला होता. त्यापैकी त्याने त्यांना ३० हजार ६९ हजार १०१ रुपयांचा पेमेंट दिले होते. मात्र उर्वरित ६२ लाख ६४ हजार ५८९ रुपयांचे पेमेंट केले नाही.
वारंवार विचारणा करुनही तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता. विविध कारण सांगून तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. जवळपास वर्षभर पेमेंटची वाट पाहून त्याने मालाचे पेमेंट केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात राजेंद्र थोरातविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ४०९, ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपीच्या चौकशीसाठी पोलिसांची एक टिम लवकरच पुण्याला जाणार आहे. राजेंद्र थोरातने अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकाची फसवणुक केली आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.