मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने लैगिंक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच १९ वर्षांचा आरोपी भावाने पलायन केले. त्याचा चारकोप पोलिसांकडून शोध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
पिडीत अल्पवयीन मुलगी कांदिवली परिसरात राहत असून आरोपी तिचा चुलत भाऊ आहे. तो त्यांच्याच घरी राहत होता. गुरुवारी २१ नोव्हेंबरला ती तिच्या घरी एकटी असताना त्याने तिच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. तिला स्वतजवळ ओढून त्याने तिच्या छातीला आणि कबरेखाली अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या प्रकारानंतर तिने चारकोप पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीत तिने आरोपीने ती पाच वर्षांची असताना घरात कोणीही नसताना तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. जिवे मारण्याची धमकी देत त्याने तिच्यासोबत दोन ते तीन वेळा लैगिंक अत्याचार केला होता. जिवाच्या भीतीसह बदनामीमुळे तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
मात्र दोन दिवसांपूर्वी घरात कोणीही नसताना त्याने पुन्हा तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला होता. तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्याच्या धमक्यासह लैगिंक अत्याचाराला कंटाळून तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून आरोपी भावाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती केली होती. तिच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी भावाविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच आरोपी पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.