मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून एका अज्ञात व्यक्तीची बेदम मारहाण करुन हत्या झाल्याचा प्रकार गिरगाव परिसरात उघडकीस आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्याने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच समीर शौकत मोमीन या २८ वर्षांच्या रेकॉर्डवरील आरोपीस व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली आहे. समीरविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीन ते पावणेचार वाजता पी. बी रोड, सिंगापूरवाला इमारतीजवळील प्रविण मेटल दुकानासमोर घडली. शुक्रवारी दुपारी प्रविण मेटल दुकानासमोर एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असून पोलीस मदत हवी आहे असा कॉल मुंबई पोलिसांच्या पोलीस कंट्रोल रुमला प्राप्त झाला होता. कॉल मिळताच व्ही. पी रोड पोलिसांचे एक पथक तिथे रवाना झाले होते. यावेळी बेशुद्धावस्थेत पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी तातउीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० असून त्याची ओळख पटेल अशी कुठलीही वस्तू सापडली नाही. क्षुल्लक वादातून त्याचे समीर मोमीनसोबत वाद झाला होता. याच वादातून त्याने त्याला बेदम मारहाण केली होती. त्याला जोरात धक्का दिल्याने त्याचा डोक जमिनीवर आपटले आणि तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला होता.
तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या समीर मोमीनला पोलिसांनी अटक केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात नऊहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी १५१ (३) कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. हत्येमागील कारणाचा उलघडा होऊ शकला नाही. समीरच्या चौकशीतून ही माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.