घरफोडीच्या आंतरराज्य टोळीच्या तिघांना अटक

बोरिवलीतील ३० लाखांचा पर्दाफाश; म्होरक्याविरुद्ध २१५ गुन्हे दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – मुंबईसह देशभरातील विविध शहरात घरफोडी करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा बोरिवली पोलिसांनी पर्दाफाश केला असून याच गुन्ह्यांत टोळीच्या म्होरक्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सलीम मोहम्मद हबीब कुरेशी ऊर्फ मुन्ना, इसरार अहमद अब्दुल सलाम कुरेशी आणि अकबरअली यादअली शेख ऊर्फ बाबा अशी या तिघांची नावे आहेत. यातील मोहम्मद सलीम हा टोळीचा म्होरक्या असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह पुणे, सुरत, राजकोट, जयपूर, नाशिक, तेलंगणा, आंधप्रदेश आदी विविध पोलीस ठाण्यात २१५ हून अधिक घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या तिघांच्या अटकेने बोरिवलीतील ३० लाखांची घरफोडीची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून या गुन्ह्यांतील सुमारे २० लाखांचे सोन्याचे, हिरेजडीत दागिने हस्तगत पोलिसांनी जप्त केले आहेत. अटकेनंतर तिन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजेश जयंतीलाल मेहता हे ६८ वर्षांचे वयोवृद्ध बोरिवलीतील एल. टी रोड, गौतमनगर परिसरात राहतात. त्यांचा मुलगा अंकित मेहता याचे सासरे पियुष रमनभाई रावल हेदेखील याच परिसरात राहतात. ३० ऑक्टोंबरला रात्री दहा वाजता पियुष रावल हे त्यांच्या पत्नीसोबत बाहेर फिरायला गेले होते. ३ नोव्हेंबरला त्यांना पियुष रावलचा फोन आला होता. यवेळी त्यांनी त्यांच्या घरात चोरी झाल्याचे सांगून तिथे जाऊन पाहणी करण्याची विनंती केली होती. त्यामुळे राजेश मेहता हे त्यांच्या राहत्या घरी गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरातील मुख्य दरवाजा आणि सेफ्टी गेटचे लॉक तुटलेले दिसले. आतील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातील हिरेजडीत, सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा सुमारे तीस लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ही माहिती बोरिवली पोलिसांना दिली होती. याप्रकरणी राजेश मेहता यांच्या तक्रारीवरुन बोरिवली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला होता.

बोरिवलीतील पॉश सोसायटीमध्ये झालेल्या घरफोडीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या घरफोडीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश कदम, इंद्रजीत पाटील, सहाय्यक फौजदार सावंत, पोलीस हवालदार बहिराम, जाधव, शेख, पोलीस शिपाई लहांगे, भोये, फर्डे, झिरवा, राणे महिला पोलीस शिपाई पाटील यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सर्व सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांत मोहम्मद सलीमचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच मोहम्मद सलीमला रायगडच्या खालापूर टोलनाका परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याचे उघडकीस आले.

चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याच्या दोन सहकार्‍यांना सांगितले होते. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन अकबरअली आणि इसरार या दोघांना बोरिवली आणि उत्तरप्रदेशच्या नोएडा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. या तिघांकडून पोलिसांनी चोरीचा ३४६ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे, हिरेजडीत दागिने, गुन्ह्यांतील कार आणि सोने गाळण्याचे इतर साहित्य असा २० लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात मोहम्मद सलीम हा घरफोडीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध पुण्यात १०२, तेलंगणा ६५, हैद्राबाद १५, गुजरातच्या सुरत आणि राजकोटमध्ये ४, जयपूर १, नाशिक ३ आणि मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यात २५ हून अधिक अशा २१५ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. मोहम्मद सलीम हा मूळचा हैद्राबादचा रहिवाशी असून घरफोडीच्या गुन्ह्यांतील आंतरराज्य टोळीचा म्होरक्या आहे.

इसरार हा उत्तरप्रदेश तर अकबरअली हा वडाळ्याचा रहिवाशी आहे. त्याचे अकबरअली आणि इसरार हे सहकारी असून चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी तो त्यांच्यावर सोपवत होता. मोहम्मद सलीमने बोरिवलीपूर्वी आंधप्रदेशच्या गुंटूरच्या पठ्ठाभीपुरम पोलीस ठाण्यात अशाच प्रकारे एक घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या अटकेने या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीने देशभरातील विविध राज्यात मोठ्या प्रमाणात घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांत त्याचा खास सहकारी वसीम अब्दुल शेख हा फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page