मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – विदेशातील नोकरीसाठी बोगस कागदपत्राच्या आधारे भारतीय पासपोर्ट बनवून बांगलादेशासह चायना आणि सौदी अरेबिया असा प्रवास केल्याप्रकरणी स्वप्नकुमार हरिपदा मंडल या ४५ वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. स्वप्नकुमार हा मूळचा बांगलादेशी नागरिक असून तो २६ वर्षांपूर्वी बांगलादेशातील बेरोजगार आणि उपासमारीला कंटाळून भारतात आला होता. याच दरम्यान त्याने बोगस दस्तावेज बनवून २०१५ साली कोलकाता येथून बोगस पासपोर्ट मिळविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
शनिवारी पहाटे साडेचार वाजता स्वप्नकुमार हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याला मुंबईहून रियाधला जायचे होते. त्याने सादर केलेल्या पासपोर्ट, बोर्डिंग पास, व्हिसाची पाहणी केल्यानंतर त्याचा पासपोर्ट जेद्धाहून जारी करण्यात आला होता. त्याच्या बोली भाषेवरुन तो बांगलादेशी असल्याचे दिसून आले. तो बांगलादेशी नागरिक असल्याचा संशय आल्याने त्याला इमिग्रेशन अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या पासपोर्टची माहिती काढल्यानंतर त्याच्या जुन्या भारतीय आणि बांगलादेशाच्या पासपोर्ट सापडली. या कागदपत्रावरुन तो भारतीय नसून बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्याने बोगस आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्राच्या आधारे कोलकाता येथून पासपोर्ट बनविले होते. तो १९९८ साली तो बांगलादेशातून भारतात आला होता. कोलकाता येथे कारपेंटरचे काम केल्यानंतर त्याने बोगस कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट बनविले होते. याच पासपोर्टवर तो दोन वेळा चायना-बांगलादेश आणि सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेला होता.
काही वर्षांनंतर त्याने पासपोर्टचे नूतनीकरण केले होते. दोन महिन्यांपूर्वी तो भारतात परत आला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी तो पुन्हा नोकरीसाठी रियाधला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. तपासात आलेल्या या माहितीनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी बलधीरा घसीटू सिंग यांच्या तक्रारीवरुन सहार पोलिीसांनी स्वप्नकुमार मंडलविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.