चार वर्षांच्या मुलीच्या उपचाराच्या नावाखाली फसवणुक

साडेचार कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – चार वर्षांच्या मुलीच्या उपचाराच्या नावाने एका टोळीने अनेकांना मदतीचे आवाहन करुन सुमारे साडेचार कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. फसवणुकीसाठी या टोळीने सिनेअभिनेत्री सना खान हिच्या नावासह तिच्या सोशल मिडीया अकाऊंटचा दुरुपयोग केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तीन भामट्याविरुद्ध माटुंगा पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. निखत खान, नौफिल काझी आणि पियुष जैन अशी या तिघांची नावे असून ते सर्वजण मुंबई सेंट्रल येथील नागपाडा, क्लेअर रोडचे रहिवाशी आहेत. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

आरिफ अहमद मंसुर अहमद शेख हे माहीम परिसरात राहत असून ते समाजसेवक आहेत. पियुष जैन याने एका ऍपच्या माध्यमातून लोकांना इनारा काझी या चार वर्षांच्या मुलीवर स्पाईनल मस्न्युतर ऍट्रॉपी नावाचा एक दुर्धंर आजार झाला आहे. त्याच्यावर हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याच्या उपचारावर अंदाजे सतरा कोटीचा खर्च अपेक्षित आहेत. त्यामुळे पियुष जैनने त्याच्या ऍपच्या माध्यमातून अनेकांना मदत करण्याचे आवाहन केले होते. या ऍपवर लोकांचा विश्‍वास बसावा म्हणून पियुषने सिनेअभिनेत्री सना खान हिच्या नावाने इंटाग्रामवर ११ जानेवारी २०२४ रोजी एक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये मुलीच्या वडिलांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आरिफ शेख यांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु केली होती. ते स्वत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यांनी इनारा काझी या मुलीविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिथे इनारा काझी नावाच्या कुठल्याही मुलीवर उपचार सुरु नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. असे असताना निखत खान, नौफिल खन आणि पियुष जैन यांनी मुलीच्या उपचाराच्या नावाखाली अनेकांकडून पैसे घेतले होते.

ही रक्कम विविध बँक खात्यात जमा झाली होती. या सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे साडेचार कोटीची रक्कम जमा झाली होती. या रक्कमेचा वापर कुठल्याही वैद्यकीय उपचारासाठी न वापरता वैयक्तिक फायद्यासाठी झाला होता. हा संपूर्ण प्रकार १ जानेवारी ते ३० जून २०२४ या कालावधीत झाला होता. हा प्रकार आरिफ शेख यांच्या निदर्शनास येताच त्यांनी कुर्ला येथील लोकल कोर्टात एक याचिका सादर करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली होती. यावेळी कोर्टाने माटुंगा पोलिसांना संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आरिफ शेख यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी निखत खान, नौफिल काझी आणि पियुष जैन या तिन्ही भामट्याविरुद्ध ४०६, ४२०, १२० बी, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. प्राथमिक तपासात पियुषने इम्पॅक्ट गुरु नावाचे एक ऍप तयार केला होता. तोच या ऍपचा संचालक आहे. त्याने निखत आणि नौफिल यांच्या मदतीने इनारा काझीची बोगस माहिती सोशल मिडीयावर व्हायरल करुन ही फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा आकडा साडेचार कोटीपेक्षा अधिक असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page