तीन वर्षांपूर्वी झालेल्या वयोवृद्धाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल

विशेष सेशन कोर्टाकडून पोलिसांना तपास करण्याचे आदेश

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – तीन वर्षांपूर्वी गुजरात-मुंबई प्रवासादरम्यान अमृतलाल कांतीलाल पटेल या ७० वर्षांच्या वयोवृद्धाची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हेमलता अमृतलाल पटेल आणि दिपक झा अशी या दोघांची नावे आहेत. विशेष सेशन कोर्टात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी देताना कोर्टाने आझाद मैदान पोलिसांना हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी झालेल्या या हत्येचा पोलिसांनी नव्याने तपास सुरु केला आहे.

ज्योसनाबेन कांतीलाल पटेल ही ६६ वर्षांची वयोवृद्ध महिला गुजरातच्या नवसारी, उदाचललुहार फलियाच्या नरेनवाडीची रहिवाशी आहे. सध्या ती इंग्लंडमध्ये वास्तव्यास आहे. मृत अमृतलाल पटेल हे तिचे भाऊ असून त्यांची प्रकृती ठिक नसल्याने तिने त्यांची देखभाल करण्यासाठी नरेंद्र आणि त्याची पत्नी गिता यांच्याकडे विनंती केली होती. त्यामुळे त्यांनी अमृतलाल यांच्याकडे दिपक झा याला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. याच दरम्यान अमृतलालची मुलगी हेमलता पटेलने बोरिवलीतील लोकल कोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी देताना कोर्टाने अमृतलालला हेमलताला मेन्टेनन्स रक्कम देण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी तिला पैसे दिले नाही. तसेच या आदेशाविरुद्ध वरच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. त्याचा हेमलताच्या मनात राग होता. याच रागातून तिने दिपक झाच्या मदतीने अमृतलाल यांची हत्येचा कट रचला होता.

गुजरातच्या बिलीमोरा ते मुंबई प्रवासादरम्यान या दोघांनी अमृतलाल यांची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगून त्यांनी त्यांना मरिनड्राईव्ह येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. शवविच्छेदन अहवालात अमृतलाल यांचा मृत्यू नैसगिक असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास थांबविला होता. या घटनेनंतर ज्योसनाबेन पटेल हिने लोकल कोर्टात एक याचिका सादर करुन हत्येचा संशय व्यक्त करुन पोलिसांना तपास करण्याची विनंती करणारी एक याचिका सादर केली होती. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर तिने विशेष सेशन कोर्टात दाद मागण्याचा प्रयत्न केला.

या याचिकेवर तीन वर्षांनी सुनावणी पूर्ण होऊन कोर्टाने आझाद मैदान पोलिसांना हेमलता पटेल आणि दिपक झा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा आता पोलिसांनी नव्याने तपास सुरु केला आहे. त्यामुळे हेमलता आणि दिपक यांची पोलिसांकडून पुन्हा चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page