जुन्या वादातून अल्पवयीन मुलाकडून तरुणावर चाकूने हल्ला
अंधेरीतील घटना; मुलाची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलाने शाणाप्पा हुसैनप्पा सिन्नावालू या तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शाणाप्पा हा गंभीररीत्या जखमी झाला असून त्याच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अल्पवयीन मुलाला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी दुपारी सव्वादोन वाजता अंधेरीतील सुभाषनगर क्रमांक दोन, राजू पंतगे यांच्या दुकानासमोर घडली. वैंकटपा सिन्नावलू हा याच परिसरातील गंगा चाळीत राहत असून जखमी शाणाप्पा हा त्याचा लहान भाऊ आहे. याच परिसरात राहणार्या अल्पवयीन मुलासोबत त्याचा जुना वाद होता. याच वादातून सोमवारी दुपारी त्याने शाणाप्पा याच्यावर चाकूने वार केले होते. त्यात त्याच्या पोटाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर आरोपी मुलगा पळून गेला होता. जखमी झालेल्या शाणाप्पाला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी वैंकटप्पा याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस काही तासांत पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अल्पवयीन असल्याने त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. सोमवारी दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.