मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – घरासमोर खेळत असलेल्या एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित आरोपीने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ऍण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेने सोमवारी उशिरापर्यंत ऍण्टॉप हिल परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी ३२ वर्षांच्या आरोपीविरुद्ध ऍण्टॉप हिल पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपीने घटनास्थळाहून पलायन केल्याने त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
३० वर्षांची तक्रारदार महिला ही ऍण्टॉप हिल येथील सायन-कोळीवाडा परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून चार वर्षांची पिडीत तिची मुलगी आहे. सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजता ही मुलगी घरासमोरच खेळत होती.याच दरम्यान तिथे ३२ वर्षांचा आरोपी अनिल आला. काही वेळानंतर त्याने तिला उचलून जवळच असलेल्या दशमेश गुरुद्वाराजवळील पार्क केलेल्या टॅक्सीत आणले. तिथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. तिची सुटका करताना त्याने हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. घरी आल्यानंतर मुलीची अवस्था पाहिल्यानंतर तिच्या आईला संशय आला. त्यामुळे तिने तिची विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. तिच्याकडून तिला अनिलने तिच्यावर लैगिंक अत्याचार केल्याचे समजले होते. त्यानंतर तिने घडलेला प्रकार ऍण्टॉप हिल पोलिसांना सांगितला. या घटनेनंतर पोलिसांनी अनिलविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळाहून पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दिवसाढवळ्या एका चार वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैगिंक अत्याचाराच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. काही वेळात तिथे लोक जमा झाले, त्यामुळे तेथील वातावरण चांगले तापले होते. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्याला आरोपीच्या अटकेचे आदेश दिले आहे. पिडीत मुलीला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहे. तिची मेडीकल करण्यात आली असून त्याचा अहवाल लवकरच पोलिसांना प्राप्त होईल असे सांगण्यात आले.