म्हाडा फ्लॅटच्या नावाने गंडा घालणार्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
तीन महिलांची एक कोटीची फसवणुक केल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – म्हाडा फ्लॅटच्या नावाने गंडा घातल्याप्रकरणी भक्ती अक्षय कांडरकर या महिलेविरुद्ध दादर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. म्हाडामध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करुन भक्तीने एका वयोवृद्ध महिलेसह तिच्या बहिणीसह वहिनीची सुमारे एक कोटीची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिरकले यांनी सांगितले.
७७ वर्षांच्या वयोवृद्ध तक्रारदार रंजना रमाकांत वराडकर ही दादरची रहिवाशी आहे. गेल्या आठ वर्षांपासून ती तिच्या पुण्यातील बहिणीकडे राहते. अधूनमधून ती तिच्या दादर येथील फ्लॅटमध्ये येते. तीन वर्षांपूर्वी तिची भक्तीशी रहेजा हॉस्पिटलमध्ये ओळख झाली होती. यावेळी तिची वहिनी अजीत वसईकर हिने तिला भक्ती ही म्हाडामध्ये अधिकारी पदावर काम करत असून तिची वरिष्ठ अधिकार्यांशी चांगली ओळख आहे. म्हाडाचे स्वस्तात फ्लॅट मिळवून देईल असे सांगितले. त्यामुळे ती तिच्या बहिण दिप्ती ऊर्फ संध्या शिंदे हिच्यासोबत भक्तीच्या प्रभादेवी येथील राहत्या घरी गेली होती. यावेळी भक्तीने तिला ती म्हाडामध्ये घराचे लॉटरी सोडण्याचे काम करत असल्याचे सांगून गोरेगाव येथील उन्नतनगरात म्हाडाच्या घराची सोडत होणार आहे. तिथे त्यांना वीस लाख रुपयांमध्ये टू बीएचके फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. तिच्यावर विश्वास ठेवून तिने तिथे फ्लॅट घेण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे तिने भक्तीला ४ जानेवारी ते २७ जानेवारी २०२२ या कालावधीत सुमारे वीस लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात एक एमओयू करार झाला होता. त्यात तिने गोरेगाव येथील उन्नतनगरात टू बीएचके फ्लॅट देण्याबाबत नमूद केले होते.
मात्र दोन वर्ष उलटूनही तिने फ्लॅटबाबत काहीच हालचाल केली नसल्याचे रंजना वराडकर हिच्या निदर्शनास आले होते. याबाबत वारंवार विचारणा करुनही तिच्याकडून तिला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे तिने तिच्याकडे फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांबाबत विचारणा सुरु केली होती. यावेळी तिने पैसे परत करण्यास नकार दिला. भक्ती कांडरकर हिने तिच्यासह तिची वहिणी प्रिया वसईकर आणि बहिण दिप्ती शिंदे यांच्याकडून अनुक्रमे साठ आणि वीस लाख रुपये घेतले होते. मात्र या दोघींनाही म्हाडाचा फ्लॅट दिला नाही. अशा प्रकारे भक्तीने रंजना वराडकर हिच्यासोबत तिच्या बहिण आणि वहिनीकडून सुमारे एक कोटी लाख रुपये फसवणुक त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच रंजना वराडकर हिने दादर पोलीस ठाण्यात भक्ती कांडरकर हिच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली मिरकले यांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर भक्तीला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले आहे.