मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम करणार्या सृष्टी विशाल तुली या २५ वर्षांच्या तरुणीने तिच्या अंधेरीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर आदित्य ऋषिकेश पंडित (२७) याला पवई पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. आदित्यकडून होणार्या अपमानास्पद वागणुक, मानसिक त्रासाला तसेच नॉन व्हेज खाण्यावरुन होणार्या भांडणामुळे सृष्टीने आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विवेककुमार नरेंद्रकुमार तुली हे ५७ वर्षांचे तक्रारदार मूळचे उत्तरप्रदेशच्या गोरखपूर, शिवपुरी कॉलनीतील रहिवाशी आहे. तिथेच ते त्यांच्या आई, भावासह त्यांच्या कुटुंबियंसोबत राहत असून त्यांचा गॅस एजन्सीचा व्यवसाय आहे. २५ वर्षांची सृष्टी ही त्यांची पुतणी असून ती दिल्लीतील द्वारका येथे राहत होती. २००९ सालापासून ती सीपीएलचे प्रशिक्षण घेत होती. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सृष्टीला एअर इंडियामध्ये पायलट म्हणून नोकरी मिळाली होती. त्यानंतर ती जून २०२३ पासून मुंबईत आली होती. तेव्हपासून ती अंधेरीतील मरोळ पोलीस कॅम्पमागील कनाकिया रेन फॉरेस्ट अपार्टमेंटच्या बी विंगमधील फ्लॅट क्रमांक ६०१ मध्ये राहत होती. २५ नोव्हेंबरला त्यांना सृष्टीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी सृष्टीची मैत्रिण उर्वी पांचाळ हिला कॉल केला होता. यावेळी तिने सृष्टीचा मित्र आदित्य पंडितला फोन दिला होता. यावेळी आदित्यने तो तिला रात्री उशिरापासून कॉल करत होता. मात्र तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तो तिच्या राहत्या घरी गेला होता. यावेळी त्याला सृष्टीने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. तिला सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
ही माहिती मिळताच विवेककुमार तुली हे त्यांच्या नातेवाईकांसोबत मुंबईला येण्यासाठी निघाले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सृष्टीचे मित्र राशी, कुणाल आणि कशिश अरोरा यांची भेट घेतली होती. त्यांच्या चौकशीत दोन वर्षांपूर्वी सृष्टीची ओळख आदित्यसोबत झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. तेव्हापासून ते दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून आदित्य तिच्यासोबतच तिच्या फ्लॅटमध्ये राहत होता. २५ नोव्हेंबरला रात्री एक वाजता तो दिल्लीला जाण्यासाठी निघाला होता. यावेळी सृष्टीने त्याला मॅसेज करुन ती आत्महत्या करत असल्याचा मॅसेज पाठविला होता. त्यामुळे तो परत आला, यावेळी त्याला सृष्टीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांच्या चौकशीतून सृष्टीचे आदित्यवर प्रचंड प्रेम होते, मात्र तो तिला चांगली वागणुक देत नव्हता. अनेकदा तो तिच्याशी क्षुल्लक कारणावरुन वाद घालत होता. सृष्टी ही नॉन व्हेज तर आदित्य व्हेजेटेरिन खात होता. मात्र त्याला सृष्टी नॉन व्हेज खात असल्याचे त्याला आवडत नव्हते. त्यावरुन तो तिचा अपमान करत होता. तिच्याशी खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करत होता.
मार्च २०२४ रोजी ते सर्वजण गुडगाव येथीलल सायबर सिटीमधील एका कार्यक्रमांत गेले होते. तिथे सृष्टीच्या नॉन व्हेज खाण्यावरुन त्यांच्यात प्रचंड वाद झाला होता. तिच्या बहिणीच्या साखरपुड्याला सृष्टीने यावे यासाठी तो तिच्यावर सतत दबाव आणत होता. मात्र तिची फ्लाईट असल्याने तिने साखरपुड्याला येण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने तिच्याशी भांडण करुन तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यानंतर त्यांच्यात दहा ते पंधरा दिवस संभाषण झाले होते. त्यामुळे सृष्टी ही प्रचंड मानसिक तणावात होती. याबाबत तिने तिच्या मित्रांशी अनेकदा बोलून दाखविले होते. आदित्य हा सृष्टीला स्वतच्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तिचा मानसिक शोषण करत होता. क्षुल्लक कारणावरुन तिच्याशी वाद घालत होता. तिला अपमान करत होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून सृष्टीने गळफास घेऊन स्वतचे जीवन संपविले होते.
हा प्रकार लक्षात येताच विवेककुमार तुली यांनी आदित्यविरुद्ध पवई पोलिसात तक्रार केली होती. आदित्यच्या मानिसक त्रासाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून सृष्टीने आत्महत्या केली होती. या आत्महत्येस तोच जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी आदित्य पंडितविरुद्ध सृष्टीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मंगळवारी त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.