जन्मदात्या पित्याकडून अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार
रिक्षाचालक असलेल्या आरोपी पित्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – जन्मदात्या पित्यानेच त्याच्या नऊ आणि दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैगिंक अत्याचार करुन त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या दिलेल्या तक्रारीवरुन बोरिववली पोलिसांनी रिक्षाचालक असलेल्या आरोपी पित्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी दिडोंशीतील विशेष सेशल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
३३ वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या दोन्ही पिडीत मुलीसोबत बोरिवलीतील ओल्ड एमएचबी कॉलनीत राहते. आरोपी हा तिचा पती असून तो रिक्षाचालक म्हणून काम करतो. तो सध्या बोरिवलीतील आयसी कॉलनीजवळील परिसरात राहतो. गेल्या काही वर्षांपासून आरोपी हा त्याच्या पत्नीला जिवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या नऊ आणि दहा वर्षांच्या मुलींसोबत अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग करत होता. या दोन्ही मुलींवर त्याने लैगिंक अत्याचार केले होते. डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला होता. जन्मदात्या पित्याकडून मिळणार्या जिवे मारण्याच्या धमकीसह मुलींवर लैगिंक अत्याचाराला कंटाळून तिने पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मंगळवारी तिने बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बोरिवली पोलिसांना आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर आरोपी पित्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीला त्याच्या बोरिवलीतील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे दोन्ही पिडीत मुलींना शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असून तिथेच त्यांची मेडीकल केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जन्मदात्या पित्यानेच स्वतच्या नऊ आणि दहा वर्षांच्या मुलींवर लैगिंक अत्याचार केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.