मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ मार्च २०२४
मुंबई, – पतीसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना चालत्या लोकलमधून पडून एका पोलीस शिपाई महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी नाहूर रेल्वे स्थानकात घडली. आश्विनी भाऊसाहेब डोमाडे असे या शिपाई महिलेचे नाव असून तिच्या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच ठाणे पोलीस दलात प्रचंड शोककळा पसरली आहे. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. तिच्या पतीची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे.
आश्विनी डोमाडे ही कळवा येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होती. सोमवारी तिला सुट्टी होती, त्यामुळे ती तिचे पती राजेंद्र पालवे याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे कामानिमित्त जात होती. ते दोघेही लोकलच्या फर्स्ट क्लास डब्ब्यातून प्रवास करत होते. ही लोकल नाहूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने येत असताना आश्विनीचा फुट बोर्डवरुन पाय घसरला आणि ती चालत्या लोकलमधून खाली पडली. याच दरम्यान ट्रक तीनवरुन जाणार्या डाऊन लोकलची धडक लागून ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला तिच्या पतीसह रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांनी तातडीने फोर्टीज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच कुर्ला रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. महिला पोलीस उपनिरीक्षक जरे यांनी तिच्या पतीची जबानी नोंदवून घेतली असून या जबानीनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी एडीआरची नोंद केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलीस तपास करत आहेत. आश्विनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबासह परिचित मित्र आणि सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.