मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – ऍण्टॉप हिल येथे एका चार वर्षांच्या मुलीवर लैगिंक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच जोगेश्वरी येथे अन्य एका आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित तरुणाने लैगिंक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या १९ वर्षांच्या आरोपीला जोगेश्वरी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
३५ वर्षांची तक्रारदार महिला ही जोगेशवरी परिसरात राहते. तिला आठ वर्षांची एक मुलगी आहे. बुधवारी दुपारी एक वाजता ही मुलगी घरापासून काही अंतरावर असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ गेली होती. यावेळी तिच्याच शेजारी राहणारा आरोपी तरुण तिथे आला आणि त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन लगट करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकाराने ही मुलगी प्रचंड घाबरली आणि घरी पळून गेली होती. घरी आलेल्या या मुलीची तिच्या आईने चौकशी केली असता तिथे घडलेला प्रकार सांगितला. तिच्याकडून ही माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने जोगेश्वरी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी १९ वर्षांच्या आरोपीविरुद्ध लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपीस जोगेश्वरी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी दिडोंशीतील विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.