बॉडी व्हेरीफिकेशनच्या नावाने कपडे काढून व्हिडीओ बनविले
मनी लॉड्रिंगमध्ये कारवाईची धमकी देऊन तरुणीची फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दिल्लीतील सीबीआय कार्यालयात बोलत असल्याची बतावणी करुन मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्याचे सांगून एका २६ वर्षांच्या तरुणीला हॉटेलमध्ये रुम घेण्यास, नंतर तिला बॉडी व्हेरीफिकेशनच्या नावाने कपडे काढण्यास प्रवृत्त करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनविल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या तोतया सीबीआय अधिकार्याने तिला कारवाईच्या नावाने विविध बँक खात्यात १ लाख ७८ हजार रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. याप्रकरणी पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुकीसह विनयभंग केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अंधेरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
२६ वर्षांची तक्रारदार तरुणी तिच्या कुटुंबियांसोबत दहिसर परिसरात राहते. सध्या ती अंधेरीतील गुंदवली परिसरात असलेल्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. १९ नोव्हेंबरला ती तिच्या कार्यालयात काम करत होती. दुपारी साडेतीन वाजता तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला. त्याने तो दिल्लीहून सीबीआय कार्यालयात बोलत असल्याचे सांगितले. मनी लॉड्रिंगच्या एका गुन्ह्यांत तिचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे तिची चौकशी सुरु असून गोपनीयतेच्या नावाने त्याने तिला एका हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तिने तिच्या कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये एक रुम बुक केला होता. तिथे गेल्यानंतर त्याने तिला व्हिडीओ कॉल करुन तिचे नरेश गोयल नावाच्या व्यक्तीसोबत मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पुरावे प्राप्त झाल्याचे सांगितले.
बँक व्हेरीफिकेनच्या नावाने तिला बोलण्यात गुंतवून त्याने तिला काही बँक खात्यात पैसे पाठविण्यास प्रवृत्त केले. तिनेही त्याने दिलेल्या बँक खात्यात १ लाख ७८ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्याने बॉडी व्हेरीफिकेशन करायचे आहे असे सांगून तिला अंगावरील कपडे काढण्यास प्रवृत्त करुन तिचे अश्लील व्हिडीओ बनविले होते. हा प्रकार कोणाशी शेअर करु नकोस असे सांगून त्याने तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. काही दिवसांनी तिला तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तिने घडलेला प्रकार अंधेरी पोलिसांना सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तरुणीच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी २०४, ३ (५), ३१८ (४), ३१९ (२), ३५१ (२), ७४, ७८, ७९ भारतीय न्यास सहिता सहकलम ६६ (डी), ६७ (अ) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ज्या मोबाईलवरुन तिला कॉल आले, या मोबाईलची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी संमातर तपास सुरु केला आहे.