बिहारहून आणलेल्या घातक शस्त्रांसह त्रिकुटास अटक
सहा पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टा, ६७ काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बिहारहून आणलेल्या घातक शस्त्रांसह एका त्रिकुटाला पायधुनी येथून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी आणि मालमत्ता कक्षाच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. अभिषेककुमार अंजनीकुमार पटेल, सिद्धार्थ सुबोधकुमार सुमन ऊर्फ गोलू आणि रचित रामशिषकुमार मंडल ऊर्फ पुष्पक अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत तिन्ही आरोपीकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, एक रिव्हॉल्व्हर, तीन गावठी कट्टा, दोन रिकाम्या मॅगझीन आणि ६७ जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे. चौकशीदरम्यान या तिघांनी बिहारहून घातक शस्त्रे विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे आणून या शस्त्रांचा मुंबई शहरात विविध गुन्ह्यांत वापर केला जात होता. त्यामुळे अशा शस्त्र तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असतानाच बिहारहून मोठ्या प्रमाणात काहीजण घातक शस्त्रे घेऊन आले असून या शस्त्रांची विक्रीसाठी संबंधित आरोपी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अमोल रामचंद्र तोडकर यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्याासाठी खंडणीविरोधी पथकासह मालमत्ता कक्षाच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे पायधुनीतील पी डिमेलो रोड, प्रभू हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. गुरुवारी तिथे अभिषेकुमार, सिद्धार्थ आणि रचित हे तिघेही आले होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना सहा पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, गावठी कट्टे, दोन रिकाम्या मॅगझीन आणि ६७ काडतुसे सापडले. चौकशीत त्यांनी ते शस्त्रे बिहारहून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. या तिघांविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना शुक्रवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते कोणी दिले, त्यांनी यापूर्वीही घातक शस्त्रांची विक्री केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोरकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती कदम, जालिंद्र लेंभे, मालमत्ता कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, सहाय्यक फौजदार संदीप ब्रिद, पोलीस हवालदार संतोष सुर्वे, विजय थोरात, निलेश कंद, मुळे, रोहन सुर्वे, तोडकर, धादवड, पोलीस शिपाई राजाराम मोटे, जमील शेख, कोळी, सुशील साळुंखे, विशेष पथकातील पोलीस हवालदार हरिष दलाल, शेखर पाटील, रवी राठोड, पोलीस शिपाई संतोष वायाळ, उत्कृष्ठ कदम यांनी केली.