लैगिंक अत्याचाराची केस मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी
प्रेयसीसह चौघांविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – पंधरा लाखांच्या आर्थिक वादानंतर प्रेयसीने तिच्याच प्रियकराविरुद्ध लैगिंक अत्याचाराची तक्रार केली होती. ही केस मागे घेण्यासाठी प्रियकराच्या वडिलांकडे पाच लाखांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रेयसीसह तिच्या वडिल, भाऊ आणि नातेवाईक अशा चौघांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या चौघांना चौकशीसाठी लवकरच समन्स बजाविले जाणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
६५ वर्षांचे तक्रारदार दादर येथे राहत असून त्यांचा फुल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या मुलाचे निता (नावात बदल) या तरुणीशी प्रेमसंबंध होते. याच संबंधातून विविध कारण सांगून निताने त्याच्याकडून वेळोवेळी पंधरा लाख रुपये घेतले होते. मात्र वारंवार विचारणा करुनही ती त्याला पैसे परत करत नव्हती. त्यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला होता. या वादानंतर तिने त्याला पंधरा लाख रुपये परत करणार नाही, तुला काय करायचे आहे ते कर अशी धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर नितासह तिच्या कुटुंबियांनी त्याची नातेवाईकासह परिसरात बदनामी सुरु केली होती. त्यांच्यात वाद मिटविण्यासाठी त्यांनी चर्चा करण्याचा निर्णय घेतला होता. ७ जून २०२४ दुपारी बारा वाजता दोन्ही कुटुंबातील सदस्य बोरिवलीतील गणपत पाटील नगरमधील त्यांच्या घरी जमा झाले होते. यावेळी वसंत बुटीया, त्यांची मुलगी निता, मुलगा पुरुषोत्तम आणि नातेवाईक सुनिल आदी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाविरुद्ध बोरिवली पोलिसांत खोटी तक्रार करण्याची धमकी देत पोलिसात तक्रार न करण्यासाठी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. मात्र तक्रारदारांनी त्यांना खंडणीची रक्कम देण्यास नकार देता त्यांच्याच पंधरा लाखांची मागणी केली होती. आर्थिक वादातून त्यांच्यात पुन्हा प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. या भांडणानंतर निताने त्यांच्या मुलाविरुद्घ गोराई पोलीस ठाण्यात लैगिंक अत्याचाराची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही माहिती समजताच तक्रारदार पुन्हा वसंत आणि निता यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. यावेळी या दोघांनी लैगिंक अत्याचाराची केस मागे घेण्यासाठी त्यांच्याकडे आणखीन पाच लाख रुपयांची मागणी केली.
ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्या मुलाचे आयुष्य बर्बाद करण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर त्यांनी एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या आरोपीविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे तसेच अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.