मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कौटुंबिक वादातून राजश्री अमोल पवार या ३० वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना ट्रॉम्बे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमोल श्रीरंग पवार (४०) या आरोपी पतीविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. हत्येनंतर अमोल मोबाईल बंद करुन पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, सोळा ज्योतिबा मंदिराजवळील शिवज्योत चाळीत घडली. सुरेखा विलास सस्ते ही महिला याच परिसरातील समता चाळीत राहत असून मृत राजश्री ही तिच्या बहिणीची मुलगी आहे. तिचे अमोलसोबत विवाह झाला होता. सध्या ती तिच्या पतीसह दोन मुलांसोबत शिवज्योत चाळीत राहत होती. अमोल हा काहीच कामधंदा करत नसून त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे राजश्री ही घरकाम करुन स्वतच्या घराच्या उदरनिर्वाह चालवत होती. अनेकदा अमोल हा राजश्रीकडे दारुसाठी पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीतर तो तिला मारहाण करत होता. दारुसह कौटुंबिक वादातून त्यांच्यात खटके उडत होते. शुक्रवारी सकाळी त्यांच्यात अशाच कौटुंबिक कारणावरुन वाद झाला होता. या वादातून रागाच्या भरात त्याने राजश्रीची गळा आवळून हत्या केली. या हत्येनंतर तो घरातून पळून गेला होता.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली होती. राजश्रीला पोलिसांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी तिची मावशी सुरेखा सस्ते हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अमोलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. अमोल हा मूळचा सातार्याचा रहिवाशी आहे. हत्येनंतर तो त्याच्या गावी पळून गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रॉम्बे पोलिसांची पाच टिम मुंबईसह मुंबईबाहेर पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.