चार-पाच दिवसांच्या क्रेडिटवर दिलेल्या पैशांचा अपहार
१.७२ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – चार-पाच दिवसांच्या क्रेडिटवर दिलेल्या १ कोटी ७२ लाख रुपयांचा अपहार करुन दोन व्यावसायिकाची फसवणुक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुकेश कानाराम कुमावत आणि संजय खिच्चा या दोन्ही व्यावसायिकाविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स बजाविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नितीन जैसुखभाई डोडिया हे बोरिवली परिसरात राहत असून त्यांचा मॅनपॉवर सप्लायसह टेक्सटाईल्स, कपडे आणि फुटवेअरचा व्यवसाय आहे. त्यांची घाटकोपर येथे एनजेडी इंटरप्रायझेस नावाची एक कंपनी आहे. मनिष अमृतलाल पोपट हे त्यांचे परिचित असून अत्यंत विश्वास मित्र आहेत. त्यांच्यात अनेकदा व्यवसायानिमित्त पैशांची देवाणघेवाण होते. ऑगस्ट २०२४ रोजी मनिष पोपट यांचे परिचित मुकेशकुमार कुमावत आणि संजय खिच्चा यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे चार ते पाच दिवसांसाठी १ कोटी ७२ लाखांची मागणी केली होती. या दोघांची मनिष पोपट यांनी शिफारस केली होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सांगण्यावरुन या दोघांनाही १ कोटी ७२ लाख रुपये चार ते पाच दिवसांच्या क्रेडिटवर दिले होते. ही रक्कम तामिळनाडूच्या महावीर ट्रेडिंगच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. एक आठवडा झाल्यानंतर त्यांनी मनिष यांच्याकडे पैशांविषयी विचारणा केली होती. त्यांनी मुकेश आणि संजयकडे पैशांबाबत विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांच्याकडे आणखीन काही दिवसांची मुदत मागून पैशाबाबत टाळाटाळ करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांना आणखीन काही दिवसांची मुदत दिली होती.
मात्र दोन महिने उलटूनही त्यांनी पैसे परत केले नाही. भुलेश्वर येथील आरोपींच्या कार्यालयात घरी गेल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच मनिष पोपट यांनी एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्यासह नितीन डोडिया याचंी पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. ही रक्कम नितीन डोडिया यांनी मनिष पोपट आणि त्यांनी मुकेश कुमावत आणि संजय खिच्चा यांना दिले होते. त्यामुळे नितीन डोडिया यांच्या जबानीवरुन पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. त्यांनी ती रक्कम कोणाला दिली, त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.