मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० नोव्हेंबर २०२४
मुंबई, – भांडुपच्या एका नामांकित शाळेतील मुलीवर विनयभंगाची घटना ताजी असताना आठ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा तिच्याच परिचित एका इलेक्ट्रीशियन व्यक्तीने अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचा प्रकार भांडुपमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच ४९ वर्षांच्या आरोपीस अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार महिला ही भांडुप येथे राहत असून बळीत तिची आठ वर्षांची मुलगी आहे. याच परिसरात आरोपी राहत असून तो इलेक्ट्रीशियन म्हणून काम करतो. गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता ही मुलगी घराजवळील सार्वजनिक शौचालयात गेली होती. यावेळी तिथे आरोपी आला आणित्याने तिच्या उजव्या हाताला जोरात चिमटा काढला. त्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिला घरामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि त्याला जोरात धक्का देऊन घरी पळून आली. घरी आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिने भांडुप पोलिसांना हा प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत शुक्रवारी सकाळी त्याला पोलिसांनी अटक केली. बळीत आणि आरोपी हे एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले.