मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ डिसेंबर २०२४
मुंबई, – शहरात तीन विविध अपघाताच्या घटनेत एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलासह तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नागपाडा, बोरिवली आणि समतानगर पोलिसांनी तीन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. या अपघातप्रकरणी एका चालकास बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. मृतांमध्ये हुध गुलाब रबानी अन्सारी या सोळा वर्षांच्य मुलासह साईराज महेंद्र चव्हाण आणि इर्शाद यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील साईराज हा बॅक कर्मचारी आहे तर इर्शाद हा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. काही दिवसांपूर्वीच तो मुंबईत नोकरीसाठी आला होता.
पहिला अपघात शनिवारी रात्री उशिरा अडीच वाजता नागपाडा येथील आग्रीपाड्याकडे जाणार्या वाय ब्रिजवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत हुध अन्सारीच्या आईच्या छातीत दुखू लागल्याने शनिवारी तिला ओकार्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तिथे त्यांच्या कुटुंबियासह इतर नातेवाईक उपस्थित होते. रात्री दिड वाजता त्यांनी अब्दुलला हुधला घरी जाऊन जेवण करुन येण्यास सांगितले. त्यामुळे अब्दुल हा त्याचा आतेभाऊ हुधसोबत त्याच्या बाईकवरुन घरी जाण्यासाठी निघाला होता. ही बाईक वाय ब्रिजवरुन जात असताना अब्दुलने हलर्जीपणाने भरवेगात बाईक चालवून पुढे जाणार्या एका बाईक धडक दिली. या अपघातात त्याच्या मागे बसलेला हुध अन्सारी हा गंभीररीत्या जखमी झाला. त्यामुळे त्याला ओकार्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पहाटे चार वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. ही माहिती मिळताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अब्दुल वदुद अन्सारी याच्याविरुद्ध नागपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दुसरा अपघात कांदिवलीत झाला. मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असलेला दिपक रामानंद यादव हा कांदिवलीतील हनुमाननगर परिसरात राहतो. एका खाजगी कंपनीत तो कॉन्ट्रक्टर म्हणून काम करतो. त्याच्याकडे तीन कामगार कामाला असून त्यात इर्शाद नावाच्या एका कामगाराचा समावेश होता. इर्शाद हा उत्तरप्रदेशात राहत असून त्याचे कुटुंबिय तिथे राहतात. गेल्याच आठवड्यात तो उत्तरप्रदेशातून मुंबईत नोकरीसाठी आला होता. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता तो वडारपाडा रोड क्रमांक एकजवळ रस्ता क्रॉस करत होता. यावेळी भरवेगात जाणार्या डीजीएस ग्रुप कंपनीत काम करणार्या डंपर मिक्सर चालकाने त्याला धडक दिली होती. त्यात इर्शाद हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर डंपर मिक्सर चालकाने तेथून पलायन केले होते. याप्रकरणी दिपक यादव यांच्या तक्रारीवरुन समतानगर पोलिसांनी चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर मिक्सर चालवून रस्ता क्रॉस करणार्या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. चालक पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.
तिसरा अपघात गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता बोरिवलीतील एस. व्ही रोड, शरयू बारसमोरील बोरिवली पेट्रोलपंपाजवळ झाला. महेंद्र अशोक चव्हाण हे मिरारोड येथे राहत असून ३१ वर्षांचा मृत साईराज हा त्यांचा मुलगा आहे. तो एका खाजगी बँकेत कामाला असून सध्या बोरिवलीतील शाखेत कार्यरत आहे. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला. सायंकाळी साडेसहा वाजता तो शरयू बारसमोरील रस्त्यावर क्रॉस करत होता. यावेळी एका ट्रॅव्हेल्स बसने त्याला धडक दिली होती. जखमी झालेल्या साईराजला शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याला पावणेआठ वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातप्रकरणी मोहम्मद कलाम लल्लन खान या ४८ वर्षांच्या चालकास बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली.