घातक शस्त्रांच्या धाकावर सुक्या माशांच्या गोणी पळविले
वडाळ्यातील घटना; दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ डिसेंबर २०२४
मुंबई, – घातक शस्त्रांचा धाक दाखवून घरात प्रवेश केलेल्या दोन अज्ञात व्यक्तीने तरुणाचे हातपाय बांधून सुमारे सव्वासहा लाख रुपयांचे सुके मासे आणि गोणी असा मुद्देमाल पळवून नेल्याचा प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
२८ वर्षांचा मुजाहिद्दीन मोहम्मदीड स्माईल हा एका खाजगी कंपनीत कामाला असून तो वडाळा येथील आरएके मार्ग, स्टेलर्स मेंशन अपार्टमेंटमध्ये दहाव्या मजल्यावरील १००७ मध्ये राहतो. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता तो त्याच्या घरी होता. यावेळी त्याच्या घरी दोन अज्ञात तरुणांनी प्रवेश केला. या दोघांनी त्याला घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्याच्या खांद्याला चाकूने वार केले होते. त्याचे हातपाय बांधून तोंडात कपड्याचा बोळा कोंबला. त्यानंतर या दोघांनी त्याच्या भावोजीच्या व्यवसायाच्या रुममध्ये ठेवलेले ५ लाख ३२ हजाराचे सुके मासे आणि एक लाख रुपयांचे गोणी असा ६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते.
काही वेळानंतर मुजाहिद्दीनने स्वतची सुटका करुन स्थानिक रहिवाशांसह रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना हा प्रकार सांगितला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मुजाहिद्दीनच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी रॉबरीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या रॉबरीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. चोरट्याने घरातील कुठल्याही वस्तूला हात लावला नव्हता. ते फक्त सुके मासे आणि गोणी घेऊन पळून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. व्यावसायिक वादातून हा प्रकार घडला आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.