निलंबित पोलीस कर्मचार्‍यामुळे दोन पोलिसांची आर्थिक फसवणुक

कर्जाचे हप्ते भरले नाही म्हणून दोघांच्या पगारातून अठरा लाखांची कर्जाची वसुली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ मार्च २०२४
मुंबई, – मुंबई पोलीस दलातील एका निलंबित पोलीस कर्मचार्‍यामुळे दोन पोलिसांची आर्थिक फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार नायगाव परिसरात उघडकीस आला आहे. कर्ज घेतल्यानंतर एकही हप्ता न भरल्यामुळे एका महिला पोलीस कर्मचार्‍यासह दोघांच्या पगारातून कर्जाची वसुली होत आहे. त्यामुळे या दोघांना आतापर्यंत सुमारे अठरा लाखांचा आर्थिक फटका बसला असून कर्जासाठी जामिनदार राहणे या दोन्ही पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी निलंबित पोलीस हवालदार संजय विश्‍वनाथ हातेकर याच्याविरुद्ध भोईवाडा पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. एक लाख दहा हजाराच्या कर्जाची आवश्यकता असल्याचे सांगून त्याने सतरा लाख दहा हजार रुपयांचे कर्ज घेऊन ही फसवणुक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत लवकरच संजय हातेकर याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

रेखा जगन्नाथ कुंभार या मुंब्रा येथे राहत असून सध्या ल विभाग नायगाव येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. दादर येथील नायगाव परिसरात असलेल्या बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पंतसंस्थेची ती २०१४ पासून सभासद आहेत. पोलीस हवालदार संजय हातेकर हा बदलापूर येथे राहत असून ती त्याला गेल्या तीन वर्षांपासून ओळखते. संजयला पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले असून तोदेखील या पंतस्थेचा सभासद आहे. रेखा कुंभार हिच्याह पोलीस हवालदार अविनाश घस्ते हेदेखील संजय हातेकरला गेल्या वीस वर्षांपासून ओळखतात. नायगाव सशस्त्र पोलीस दलात असताना संजयने पंतसंस्थेतून सोळा लाख रुपयांचे खाजगी कर्ज घेतले होते. कर्जानंतर तो सतत गैरहजर राहत असल्याने त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्याचा निलंबनाचा कालावधी डिसेंबर २०१८ ते जून २०१९ असा होता. जून २०२१ रोजी संजयचे निलंबन मागे घेऊन त्याला पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले होते. त्यानंतर त्याने पुन्हा कर्जासाठी रेखा कुंभार आणि अविनाश घस्ते यांना जामिनदार राहण्यास विनंती केली होती. एक लाख हजार रुपयांचे कर्ज घेतो असे सांगून त्याने सतरा लाख दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला होता.

हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी अर्जावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. मात्र खूप विनंती केल्यानंतर तसेच त्याच्या कुटुबांची दयनीय अवस्था पाहून त्यांनी कर्जाच्या अर्जावर स्वाक्षरी केल्या होत्या. २०२२ रोजी रेखा कुंभार या वैयक्तिक कर्जाच्या चौकशीसाठी बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पंतसंस्थेत गेली होती. यावेळी तिला संजय हा कर्जाचे हप्ते भरत नसल्याचे समजले. त्याच्या कर्जासाठी ती जामिनदार राहिल्याने तिला कर्ज मिळणार नाही असे सांगण्यात आले. याबाबत संजयला विचारणा केल्यानंतर तो तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. डिसेंबर २०२२ पतसंस्थेचे वसुली अधिकारी बी. एन गायकवाड यांनी तिला एक नोटीस पाठविली होती. संजयने हप्ते न भरल्याने ही रक्कम तिच्याकडून वसुल करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर मार्च २०२३ पासून तिच्या पगारातून संजयच्या कर्जाच्या हप्त्याचे वीस हजार रुपये वसुली करण्यात येत होते. पगारातून दिड लाख रुपये कपात झाल्यानंतर ती संजयच्या बदलापूर येथील घरी जाब विचारण्यासाठी गेली होती. यावेळी त्याचा मुलगा जय हातेकर याने तिला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्यामुळे तिने बदलापूर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

पतसंस्थेकडून मिळालेल्या कागदपत्रावरुन संजयने कर्ज घेतल्यानंतर एकही हप्ता भरला नव्हता. विशेष म्हणजे निलंबित असताना त्याने बोगस पावत्या बनवून ते कर्ज प्राप्त केले होते. त्यामुळे जामिनदार असलेल्या रेखा कुंभार आणि अविनाश घस्ते यांच्या पगारातून संजयच्या कर्जासाठी प्रत्येकी ९ लाख १६ हजार असे १८ लाख ३३ हजार रुपये वसुल करण्यात आले होते. पगारातून संजयच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम जात असल्याने या दोघांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे रेखाने संजय हातेकरविरुद्ध भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी ४२०, ४६५, ४६७ ४६८, ४७१ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने मदत म्हणून सहकारी पोलीस सहकार्‍याला कर्जासाठी जामिनदार राहणे या दोन्ही पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page