मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ डिसेंबर २०२४
मुंबई, – एक वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा एका २७ वर्षांच्या तरुणाने विनयभंग केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना परळ परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच संतोष विष्णू गौतम या २७ वर्षांच्या आरोपी तरुणाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
२६ वर्षांची तक्रारदार महिला ही दिवा येथे राहते. तिला एक वर्षांची मुलगी आहे. सोमवारी सायंकाळी ती तिच्या मुलीसोबत केईएम हॉस्पिटलच गेट क्रमांक तीनच्या बाजूला फुटपाथवर होती. यावेळी फुटपाथवर तिची मुलगी झोपली होती. रात्री सव्वानऊ वाजता तिथे आरोपी तरुण आला. तो तिच्या मुलीच्या शेजारी झोपला आणि त्याने तिच्या अंगाला अश्लील स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. इतकेच नव्हे तर तिच्या अंगावर हस्तमैथून केले होते. हा प्रकार तक्रारदार महिलेच्या निदर्शनास येताच तिने घडलेला प्रकार भोईवाडा पोलिसांना आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची तिथे उपस्थित पोलिसांनी गंभीर दखल घेत महिलेच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना मुंगळवारी सकाळी साडेसहा वाजता त्याला परळ येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले. अटक आरोपीचे नाव संतोष गौतम असून तो मूळचा पुण्याच्या मार्केट यार्ड, बिबवेवाडीचा रहिवाशी आहे. सध्या तो केईएम हॉस्पिटलजवळील फुटपाथवर राहत होता. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.