कारवाईची भीती दाखवत कंटेंट रायटरच्या बँक खात्यावर डल्ला 

करिअर खराब करण्याची दिली धमकी 

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ डिसेंबर २०२४
मुंबई, – सायबर गुन्ह्यात कारवाईची भीती दाखवून ठगाने कंटेंट रायटर महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध वर्सोवा पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.  

तक्रारदार या कंटेंट रायटर आहेत. गेल्या आठवड्यात त्याना एका नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने तो सायबर विभागातून बोलत असल्याचे सांगितले. काही वेळाने तो फोन एकाकडे गेला. डार्क वेब मध्ये आधारकार्ड, मोबाईल आणि ईमेल आयडी गेला असून त्याचा कोणी तरी गैर वापर करत असल्याचे तिला सांगितले. अर्ध्या तासात मिरारोड पोलीस ठाण्यात या असे तिला सांगितले. तेव्हा महिलेने पोलीस ठाण्यात येणार नकार दिला. नकार दिल्यावर ठगाने तिला डिजिटल व्हेरिफिकेशन करायचे असल्याचे सांगितले. ठगाने तिला स्काईप या अप्सवर आयडी पाठवला. त्या आयडीवर गेल्यावर एक जण पोलिसांच्या गणवेशात होता.  त्याने महिलेला तिचे नाव आणि पत्ता विचारला. तसेच घरात कोण कोण राहते त्याची माहिती घेऊन फोन दुसऱ्या ठगाकडे ट्रान्स्फर केला. त्या ठगाने तपशील तपासतो असे सांगत तुमच्या विरोधात मनी लौंड्रीन्गचा गुन्हा दाखल असून अटक वॉरंट व्हाट्सअप वर पाठवत असल्याचे तिला सांगितले.

रात्री महिला पोलीस येऊन अटक करतील, अटक केल्यावर तुमचे करिअर खराब होईल अशी भीती दाखवली. न्यायालयात तुमच्या विरोधात सर्व पुरावे आहेत असे त्याने भासवले. मनी लौंड्रीन्गच्या गुन्ह्यात तुमच्या बँकेचे सर्व तपशील तपासले जात असल्याचे सांगून बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर तो फोन तिसऱ्या ठगाकडे ट्रान्स्फर केला. आताच पोलीस ठाण्यात या, आमच्या महिला अधिकारी या चर्चा करतील, जर या गुन्ह्यात नाव मागे घ्यायचे असल्यास प्रोसेस करावी लागेल अशा भूलथापा मारल्या. जे आम्ही विचारू ते कोर्टात जाईल, तसेच तीन चार तास कोणालाही काही सांगू नका हे लोक खतरनाक असल्याचे त्याने भासवले.

आरबीआय देखील तुमचे तपशील तपासात असल्याचे तिला सांगितले. तुमच्या खात्यात अवैधरित्या पैसे येत असतात, असे सांगून विडिओ कॉल वर फोन ची स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. तुमचे पैसे आमच्याकडे सुरक्षित आहेत, २४ तासानंतर ते पैसे पुन्हा खात्यात जमा करू असे सांगत, त्याने पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले. कारवाईच्या नावाखाली ठगाने महिलेकडून १ लाख ६९ हजार रुपये उकळले. ठगाने पुन्हा महिलेला पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरु केला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page