शेअर गुंतवणुकीच्या नावाने फसवणुकीप्रकरणी त्रिकुटास अटक
चांगला परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ३.८१ कोटीची फसवणुक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ डिसेंबर २०२४
मुंबई, – चांगला परतावा देतो असे सांगून शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन एका वयोवृद्ध व्यावसायिकाची ३ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणुक करणार्या कटातील त्रिकुटाला मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पेालिसांनी अटक केली. सतीश सूर्यनाथ यादव, विकास रामशंकर मौर्या आणि सचिन कृष्णचंद चौरसिया अशी या तिघांची नाव आहेत. अटकेनंतर या तिघांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटाचा सतीश यादव हा मुख्य आरोपी असून तोच ऑनलाईन फसवणुक करणार्या काही सायबर ठगांच्या संपर्कात होता. त्यांच्याच सांगण्यावरुन त्याने बँकेत एका बोगस कंपनीच्या नावाने बॅक खाते उघडले होते, त्याच्याच बँक खात्यात सुमारे दिड कोटी रुपयांची रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
७६ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार नितीन चुनीलाल दडिया हे ब्रिजकॅण्डी परिसरात राहत असून त्यांचा बजाज गाडीचे पार्ट एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. जानेवारी महिन्यांत त्यांना शेअरसंदर्भातील व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले होते. काही दिवसांनी त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांना चांगला परवाता देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून नितीन दडिया यांनी ३१ जानेवारी ते २९ मार्च २०२४ या कालावधीत विविध शेअरासाठी ३ कोटी ८१ लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. त्यासाठी त्यांच्याकडे ग्रुप ऍडमिनने आणखीन १ कोटी १९ लाखांची मागणी केली होती. ही रक्कम भरल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात पाच कोटी रुपये जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र संबंधित व्यक्तीकडून त्यांची फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांसह सायबर सेलच्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच प्रभारी पोलीस निरीक्षक मौसमी पाटील यांच्या पथकातील मानसिंग वचकल, पोलीस शिपाई कैलास बाबरे, पोलीस हवालदार संदीपान खर्चे यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी दिवा आणि मुंंब्रा येथून सतीश यादव आणि विकास मौर्या या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत सतीश यादवने शेल या बोगस कंपनीची स्थापना करुन या कंपनीच्या नावाने शिल्ड असोशिएट नावाचे बँकेत अकाऊंट उघडले होते. फसवणुकीची सुमारे दिड कोटीची रक्कम याच बँक खात्यात जमा झाली होती. याकामी सतीशला विकास मौर्या आणि सचिन चौरसिया यांनी मदत केली होती.
ही रक्कम सायबर ठगांना दिल्यानंतर त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन देण्यात आले होते. या चौकशीनंतर त्यांचा तिसरा सहकारी सचिन चौरसिया याला पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत या तिघांचाही सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. या तिघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले असून या माहितीची पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.