४१ लाखांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची चोरी करुन परस्पर विक्री

खाजगी कंपनीच्या तीन अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ डिसेंबर २०२४
मुंबई, – सुमारे ४१ लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची चोरी करुन या वस्तूंची परस्पर विक्री करुन एका खाजगी कंपनीची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या तीन अधिकार्‍याविरुद्ध दादर पोलिसांनी चोरीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वैभव तांबे, सुजीत सिंग आणि निलेश जयसिंग जावकर अशी या तिघांची नावे आहेत. यातील वैभव हा कोहीनूर टेलिव्हिडीओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत स्टॉक मॅनेजर, सुजीत प्रोडेक्ट मॅनेजर तर निलेश हा सॉफ्टवेअर हाताळणारा अधिकारी आहे. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सुनिल डेनीस फर्नाडिस हे चेंबूर परिसरात राहत असून दादरच्या कोहीनूर टेलिव्हिडीओ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. ही कंपनीत मोबाईल, लॅपटॉप, एस सी मोबाईल, फ्रिज, वॉशिंग मशिन, टिव्ही आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूची वस्तू करत असून कंपनीचे मुंबई शहरात विविध ठिकाणी पंधराहून अधिक शोरुम आहेत. दादर येथे कंपनीचे मुख्य कार्यालय असून तिथे पन्नास कर्मचारी आणि अधिकारी कामाला आहेत. त्यात वैभव तांबे हा स्टॉक मॅनेजर, सुजीत सिंग प्रोडेक्ट मॅनेजर तर निलेश जावकर हा सॉफ्टवेअर हाताळणारा मुख्य अधिकारी म्हणून कामाला आहे. कंपनीचे मालक संजय रामचंद्र मेवानी असून ते मुख्य कार्यालयासह सर्व शोरुममधील सर्व आर्थिक व्यवहाराची नियमित माहिती घेतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्यांच्या स्टॉकमध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर मुख्य कार्यालयासह शोरुममधील सर्व स्टॉकची तपासणी कण्यात आली होती. त्यात ३० जून २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ३७ लाख ६५ हजार २८० रुपयांचे ६८ महागडे मोबाईल, दोन लॅपटॉप, तीन स्मार्ट वॉच, दोन ब्ल्यूट्यूथ हेडफोन असे ७३ प्रोडेक्ट गहाळ असल्याचे दिसून आले. याच चौकशीत वैभव तांबे, सुजीत सिंग आणि निलेश जावकर यांनी या इलेक्ट्रॉनिक वस्तूची चोरी करुन त्याची परस्पर विक्री केली होती. यातील निलेशने जयश्री जावकर, दिवीत जावकर, ए भव्य जावकर व जयवंत चव्हाण यांच्या नावाने एसी, वॉशिंग मशिन, साऊंड बार, मोबाईल, टिव्ही, एअर पॉड, हेअरफोन अशा वस्तूंची विक्री केलीहोती. मात्र त्यांच्या बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार केल्याचे दिसून आले. याबाबत निलेशची चौकशी केल्यानंतर त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. याकामी त्याला वैभव तांबे आणि सुजीत सिंग यांनी मदत केली होती.

चौकशीदरम्यान या तिघांनी सुमारे ४१ लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची परस्पर चोरी करुन या वस्तूची परस्पर विक्री करुन कंपच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच कंपनीच्या वतीने सुनिल फर्नाडिस यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या तिन्ही अधिकार्‍याविरुद्ध चोरीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिन्ही अधिकार्‍यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page