मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ डिसेंबर २०२४
मुंबई, – स्वतला पत्रकार म्हणविणार्या एका आरोपीने बिल्डरला दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी हलीम खान या पत्रकाराविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
अब्दुल ताहिर मोमुनीर खान हे व्यवसायाने बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला परिसरात राहतात. याच परिसरात त्यांच्या कंपनीकडून एका इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. याच कामाच्या संदर्भात त्यांची ओळख हलीम खानशी झाली होती. त्याने तो पत्रकार असल्याचे सांगून त्यांना शिवीगाळ केली होती. आपण पत्रकार असल्याचे सांगून त्याची ताकद काय आहे याची त्याला माहिती नाही असे सांगून त्याने त्यांच्याकडे दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. मागच्या वेळेस त्याच्या कामात त्याने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याची आठवण करुन त्यांनी त्याला खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्याची संपूर्ण इमारत तोडण्याची तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत हलीम खानने त्यांना अनेकदा खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर ती धमकी प्रत्यक्षात उतविण्याची धमकी तो त्यांना देत होता. त्याच्याकडे सतत येणार्या धमकीनंतर त्यांनी चुन्नाभट्टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत हलीम खान याच्याविरुद्ध खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. हलीम हा गुन्हा दाखल होताच पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तो सर्वांना पत्रकार असल्याचे सांगून अनेकांना खंडणीसाठी धमकी देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.