शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी चिकन विक्रेत्याला अटक
अल्पवयीन मुलीला फ्रि चिकणसह पाचशे रुपयांची ऑफर दिली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ डिसेंबर २०२४
मुंबई, – चिकन आणण्यासाठी गेलेल्या एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीकडे शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी मोहम्मद युसूफअली मोहम्मद खान या ५० वर्षांच्या चिकन विक्रेत्याला साकिनाका पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शारीरिक सुखाच्या मोबदल्यात त्याने बळीत मुलीला फ्री चिकनसह पाचशे रुपये देण्याची ऑफर दिल्याचे तपासात उघडकीस आले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
चौदा वर्षांची बळीत मुलगी ही पवई परिसरात तिच्या पालकांसोबत राहते. याच परिसरात मोहम्मद युसूफवली मोहम्मद खान हा राहत असून त्याच्या मालकीचे तिथे चिकन शॉप आहे. बुधवारी रात्री दहा वाजता ही मुलगी त्याच्या दुकानात चिकन घेण्यासाठी गेली होती. यावेळी मोहम्मद युसूफने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तू रोज माझ्याकडे अर्ध्या तासासाठी येत जा, त्यामोबदल्यात तुला फ्रीमध्ये चिकन देतो. तसेच चिकनसोबत पाचशे रुपयेही देतो असे सांगून तिच्याकडे शारीरिक सुखाची माहिती मागणी केली. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि तिने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. या माहितीने तिला धक्काच बसला होता. त्यामुळे ती तिच्या मुलीसोबत चिकन शॉपमध्ये आली होती. तिने मोहम्मद युसूफकडे जाब विचारला असता त्याने तिलाच शिवीगाळ करुन तिच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार साकिनाका पोलिसांना सांगून मोहम्मद युसूफविरुदध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच मोहम्मद युसूफ खान या ५० वर्षांच्या चिकन विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.