पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन पडून आरोपी गंभीररीत्या जखमी
पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न महागात पडला
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ मार्च २०२४
मुंबई, – मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतल्यानंतर लॉकअपमध्ये असलेल्या एका २५ वर्षांच्या आरोपी तरुणाने लघुशंकेचा बहाणा करुन पोलीस शिपायाच्या हातावर झटका देऊन तिसर्या मजल्यावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नात तो टेरेसवरुन पडून गंभीररीत्या जखमी झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याच्या कमरेला आणि उजव्या पायाला दुखापत झाली आहे. समीर आरिफ सिद्धीकी असे या २५ वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आरिफ हा मिरारोड येथील मेट्रोजवळील झोपडपट्टीत राहतो. मंगळवारी त्याला मोबाईल चोरीच्या एका गुन्ह्यांत संशयित आरोपी म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध १२२ डी कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला नंतर पोलिसांनी अटक केली होती. रात्री उशिरा पाऊणच्या सुमारास त्याने लघुशंकेचा बहाणा केला होता. त्याला घेऊन जात असताना त्याने एका पोलीस शिपायाच्या हातावर जोरात फटका मारला. पहिल्या मजल्याच्या टेक्निकल रुममध्ये प्रवेश केल्यानंतर तो केबल वायरच्या सहाय्याने तिसर्या मजल्यावरील टेरेसवर गेला. तेथून पुन्हा खाली उतरताना त्याचा तोल गेला आणि तो टेरेसवरुन खाली पडला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेनंतर जखमी झालेल्या समीरला पोलिसांनी तातडीने समोरील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे सीटी स्कॅन आणि एक्सरे काढल्यानंतर त्याच्या कमरेला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते.
याप्रकरणी पोलीस शिपाई दिनेश विलास मोरे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी समीरविरुद्ध २२४, ५११ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री उशिरा कांदिवली पोलीस ठाण्यात घडलेल्या या प्रकारामुळे तिथे उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.