मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ डिसेंबर २०२४
मुंबई, – भरवेगात बस चालविताना बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा कुर्ला परिसरात घडली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून त्यात तीन महिलांसह एक पुरुषाचा समावेश आहे. अपघातात २८ हून अधिक जखमी झाले असून त्यांच्यावर सायन आणि भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत. बेस्ट बसचा ब्रेक फेड झाल्याने बसने दहाहून अधिक रिक्षांसह खाजगी वाहनांना धडक दिली होती. त्यात या सर्व वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. अपघातामुळे कुर्ला परिसरातील वाहतूक सेवेवर प्रचंड परिणाम झाला होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत वाहतूक सेवा सुरळीत आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरु केले होते. अपघाताच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
हा अपघात सोमवारी रात्री पावणेदहा वाजता कुर्ला यगेथील एलबीएस मार्गावरील एस. जी बर्वे रोड, एल वॉर्डसमोरील अंजमन-ए-इस्माल शाळेजवळ झाला. बेस्टची ३३२ क्रमांकाची बस अंधेरी-कुर्ला या मार्गावरुन धावते. सोमवारी रात्री ही बस कुर्ला डेपोहून अंधेरी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होते. कुर्ला हा परिसर अत्यंत गजबजलेला परिसर म्हणून ओळखला जातो. तरीही चालकाने बस भरवेगात चालविण्याचा प्रयत्न केला होता. याच प्रयत्नात बसचा ब्रेक फेल झाला आणि त्याने रस्त्याच्या कडेसह बसच्या पुढे जाणार्या काही रिक्षांसह खाजगी वाहनांना जोरात धडक दिली. बसच्या धडकेने काही पादचारी चिरडले गेल्याने अपघातात ३० हून अधिक जखमी झाले होते. काही वेळानंतर ही बस एका खाजगी सोसायटीजवळ येऊन थांबली. या घटनेने तिथे उपस्थित लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. बस अपघातात जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रहिवाशांनी मिळेल त्या वाहनांनी जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. यावेळी दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. त्यामुळे मृतांची आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. याप्रकरणी काही प्रत्यक्षदर्शींची जबानी नोंदविण्यात आली आहे. या जबानीची पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. दुसरीकडे रुग्णालयात उपचार घेणार्या माहिती काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते. मृतांसह जखमींची नावे समजू शकले नाही. अपघातात रिक्षांसह खाजगी वाहने अशा दहाहून वाहनांचे प्रचंड नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघाताचे ठिकाण गजबजलेले ठिकाण असल्याने बसने अनेकांना धडक दिली होती. वाटेत येणार्या प्रत्येकाला धडक दिल्याने अपघातात ३० हून अधिक जखमी झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती रात्री उशिरा पोलिसांकडून देण्यात आली होती.
अपघातामुळे कुर्ला परिसरातील वाहतूक सेवेवर प्रचंड परिणाम झाला होता. त्यामुळे या परिसरातील वाहतूक दुसर्या ठिकाणी वळविण्यात आली होती. लोकांमध्ये प्रचंड संताप असल्याने वरिष्ठांनी घटनास्थळी धाव घेतली होती. परिस्थितीत चिघळू नये म्हणून तिथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी बसचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून संंबंधित् मृतांसह जखमींना कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.