दारुच्या नशेत धमकी देणार्या झारखंडच्या आरोपीस अटक
बॉम्बस्फोटासह पंतप्रधानांना जिवे मारण्याची धमकी दिली होती
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ डिसेंबर २०२४
मुंबई, – मुंबई शहरातील संभाव्य बॉम्बस्फोटासह देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच धमकी देणार्या झारखंडच्या एका आरोपीस मुंबई एटीएससह स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या अटक केली. मिर्झा मोहम्मद बेग असे या ३६ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. झारखंडचा रहिवाशी असलेल्या मिर्झाची अलीकडेच नोकरी गेली होती. त्यामुळे तो मानसिक नैराश्यात होता. दारुच्या नशेत त्याने वाहतूक पोलिसांना कॉल करुन ही धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ही धमकी देणे त्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. ‘
दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा मुंबई पोलिसांच्या वाहतूक मुख्यालयातील कंट्रोल रुममध्ये एका अज्ञात व्यक्तीने एक मॅसेज पाठविला होता. त्यात त्याने ठाण्यातील एका खाजगी कंपनीतील कर्मचारी प्रिंस खान आणि त्याचा सहकारी सैफी अब्बास हे पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंट आहे. भारतीय सैन्याला बर्बाद करण्याच्या उद्देशाने त्यांनी मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा जमा केला आहे. तसेच प्रिंस खान हा लवकरच धनबाद शहरात बॉम्बस्फोटाची मालिका घडविणार आहे. याच कंपनीचा मालक इरफान रजादिया हादेखील आयएसआयचा एजंट असून तो मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडविणार आहे. या दोघांवर बॉम्बस्फोटासह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. या मॅसेजची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वरळी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि एटीएसला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरळी पोलिसांनी बॉम्बस्फोटासह पंतप्रधानांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित मोबाईलचे सीडीआर काढून आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना मिर्झा मोहम्मद बेग याला राजस्थानच्या अजमेर शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तपासात मिर्झा हा झारखंडचा रहिवाशी आहे. तो गुजरात्या पालनपूर शहरातील एका खाजगी कंपनीत कामाला होता. कामावर असताना त्याने मद्यप्राशन केले होते. त्यामुळे त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. दोन दिवसांपूर्वी त्याने मद्यप्राशन केले होते. दारुच्या नशेत असताना त्याने झारखंड पोलिसांसह वरळी वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन ही धमकी दिली होती. या धमकीनंतर तो गुजरातहून राजस्थानला गेला होता. अजमेरहून तो त्याच्या झारखंडच्या गावी जाणार होता. मात्र अजमेरला गेल्यानंतर त्याला एटीएस आणि वरळी पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच दारुच्या नशेत हा कॉल केल्याची कबुली दिली. पहिला कॉल त्याने झारखंड पोलिसांना तर दुसरा कॉल मुंबई पोलिसांच्या वाहतूक कंट्रोल रुमला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. कामावरुन काढून टाकल्याचा राग, त्यातून आलेले नैराश्यातून त्याने हा कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.