पॅरोलवर सुटल्यानंतर पळालेल्या अरुण गवळीच्या सहकार्‍याला अटक

शिवसेनेचे कमलाकर जामसांडेकर हत्येत जन्मठेपेची शिक्षा झाली होती

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ मार्च २०२४
मुंबई, – कोल्हापूर कारागृहातून पॅरोलवर सुटल्यानंतर पळून गेलेल्या गॅगस्टर अरुण गवळीचा सहकारी नरेंद्र लालमणी गिरी (३९) याला नवी मुंबईतील घणसोली परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या अधिकार्‍यांनी अटक केली. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येत अरुण गवळीसह अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली होती, त्यात नरेंद्र लालमणी याचा समावेश होता. गुन्हा दाखल होताच गेल्या दिड महिन्यांपासून तो पोलिसांना चकमा देत होता, अखेर त्याला प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे व त्यांच्या पथकाने नवी मुंबईतून अटक केली.

२ मार्च २००७ रोजी घाटकोपर येथे शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची गॅगस्टर अरुण गवळीच्या आदेशावरुन त्याच्याच सहकार्‍यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येच्या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. याप्रकरणी हत्येसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच हत्येतील मारेकर्‍यासह कटाचा मुख्य सूत्रधार असलेल्या अरुण गवळीला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. तपास पूर्ण झाल्यानंतर मोक्का न्यायालयात आरोपीविरुद्ध आरोपपत्र सादर करण्यात आले होते. खटल्याची सुनावणी पूर्ण होताच अरुण गवळीसह अकरा आरेापींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तेव्हापासून सर्व आरोपी कोल्हापूर कारागृहात शिक्षा भोगत होते.

जन्मठेप झालेल्या आरोपींमध्ये नरेंद्र लालमणी याचा समावेश होता. पंधरा वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याने गेल्या वर्षी पॅरोलसाठी अर्ज केला होता. त्याचा अर्ज मंजूर करुन त्याला ११ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीसाठी पॅरोलवर सोडून देणयात आले होते. यावेळी त्याला ३१ जानेवारीला पुन्हा कारागृहात हजर होणे आवश्यक होते. मात्र पॅरोल संपल्यानंतर कारागृहात हजर न राहता तो पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच कारागृहाच्या वतीने तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी नरेंद्रविरुद्ध २२४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. त्याचा गुन्हे शाखेचे अधिकारीही शोध घेत होते.गेल्या दिड महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. तपासात तो महाराष्ट्राबाहेर पळून गेला होता. प्रत्येक ठिकाणी तो त्याचे नाव आणि वास्तव्य बदलून राहत असल्याचे उघडकीस आले होते. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु ठेवला होता.

ही शोधमोहीम सुरु असतानाच नरेंद्र हा नवी मुंबईतील घणसोली परिसरात येणार असल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सुर्वे यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त चेतन काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक इंद्रजीत शिरसाट, पोलीस हवालदार शिवाजी जाधव, आकाश मांगले, राहुल अनभुले, सुहास कांबळे, भास्कर गायकवाड यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी रात्री साडेअकरावाजता घणसोली येथे नरेंद्र हा आला असता त्याला पोलिसांनी शिताफीने अटक केली. अटकेनंतर त्याला तुर्भे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page