आठ व दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलीच्या विनयभंग

विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत दोन्ही आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ डिसेंबर २०२४
मुंबई, – आठ आणि दहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच परिचित व्यक्तींनी अश्‍लील चाळे करुन विनयभंग केल्याची घटना बोरिवली आणि घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोरिवली आणि घाटकोपर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन रिक्षाचालकासह दोघांना अटक केली. याच गुंन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहा वर्षांची बळीत मुलगी बोरिवली परिसरात राहत असून ती सध्या शिक्षण घेत आहे. तिच्या शेजारी आरोपी राहत असून तो रिक्षाचालक म्हणून काम करते. सोमवारी सायंकाळी ही मुलगी तिच्या घरी एकटीच होती. यावेळी घरात कोणीही नसताना आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. त्याने तिला स्वतकडे ओढून तिच्याशी अश्‍लील चाळे करण्यास सुरुवात केली होती. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन त्याने तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार नंतर तिने तिच्या पालकांना सांतिला होता. त्यानंतर त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा त्याला पोलिसांनी बोरिवली परिसरातून अटक केली.

दुसर्‍या घटनेत एका आठ वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला. याप्रकणी गुन्हा दाखल होताच ३६ वर्षांच्या आरोपीस घाटकोपर पोलिसांनी अटक केली. ५० वर्षांची तक्रारदार महिला घाटकोपर येथे राहत असून तिचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. आठ वर्षांची बळीत तिची मुलगी आहे. याच परिसरात आरोपी राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. गेल्या आठवड्यात तो तिला खेळण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी त्याने त्याच्या गाडीवर तिला बसवून तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. सोमवारी हा प्रकार मुलीकडून तिच्या आईला समजला होता. त्यानंतर तिने घाटकोपर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page