मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ डिसेंबर २०२४
मुंबई, – विना हेल्मेट बाईक चालविल्याप्रकरणी कारवाई करताना एका महिला पोलीस शिपायाशी हुज्जत घालून इतर पोलिसांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी देणे दोन तरुणींना चांगलेच महागात पडले आहे. या दोन्ही तरुणींविरुद्ध मुलुंड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रुचिता श्याम तरे आणि हिनल श्याम तरे अशी या दोघांची नावे असून त्या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत.
कर्जत येथे राहणार्या तृप्ती ओंकार सरावते या मुलुंड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता त्या त्यांच्या सहकार्यासोबत विना हेल्मेट बाईक चालविणार्या चालकाविरुद्ध कारवाई करत होत्या. यावेळी तिथे विना हेल्मेटने बाईक चालविणार्या रुचिता आणि हिनल या दोघींना पोलिसांनी थांबवून त्यांच्यावर कारवाई सुरु केली होती. या कारवाईला विरोध करुन या दोघींनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने त्यातील एकीने तृप्ती सरावते यांच्या ओठावर मोबाईलने दुखापत केली होती. त्यानंतर इतर पोलिसांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकारानंतर पोलिसांनी या दोघींनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन मुलुंड पोलीस ठाण्यात आणले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच या दोघींनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तपासात त्या दोघीही सख्ख्या बहिणी असून मुलुंडच्या एस. एन रोड, पूर्णिमा इमारतीजवळील सिद्धार्थनगरचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.