मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ डिसेंबर २०२४
मुंबई, – चरससह घातक शस्त्रांसह एका रेकॉर्डवरील आरोपीस पवई पोलिसांनी अटक केली. मोहम्मद सादिक हनीफ सय्यद असे या ४६ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी १३ किलो चरससह एक गावठी कट्टा, कार आणि कॅश असा ३ कोटी ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध ड्रग्जसहीत घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद सादिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ड्रग्जशी संबंधित तीन गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणून त्याची मुंबई शहरात विक्री होत असल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा आणि ऍण्टी नारकोटीक्स सेलला अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना पवईतील विहार सरोवरजवळील चॉंदशहावली दर्गासमोर काहीजण ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस उपनिरीक्षक शोभराज सरक, पोलीस हवालदार उदय लांडगे, सुभाष खंडागळे, पोलीस शिपाई राकेश अहिरे, केदार गायकवाड, निवृत्ती पवार यांनी सोमवारी ९ डिसेंबरला तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे एका मारुती अल्टो कारमधून आलेल्या मोहम्मद सादिकला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या कारची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना ६ किलो ३२ ग्रॅम वजनाचे चरस, एक गावठी कट्टा सापडला. हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर पुढील चौकशीसाठी पवई पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
चौकशीदरम्यान त्याने त्याच्या घरी आणखीन चरसचा साठा ठेवल्याची कबुली दिली होती. या कबुलीनंतर पोलिसांनी त्याच्या चॉंदशहावली दर्गा कंपाऊंडमधील राहत्या घरी कारवाई करुन ७ किलो १८५ ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. अशा प्रकारे या दोन्ही कारवाईत पोलिसांनी ३ कोटी ३० लाख ४२ हजार ५०० रुपयांचा १३ किलो २१७ चरसचा साठा, एक गावठी कट्टा, एक मारुती अल्टो कार, एक चिलिम, साडेतीन हजार रुपयांची कॅश असा ३ कोटी ३४ लाख ५५ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध नंतर ड्रग्जसहीत घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याल पोलीस कोठडी सुनावली आहे. मोहम्मद सादिक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ड्रग्ज विक्रीचे दोन तसेच ड्रग्ज सेवन केल्याचा एक अशा तीन गुन्ह्यांची नोंद आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने चरस कोठून आणला, त्याला ते कोणी दिले, तो चरस कोणाला देणार होता, या गुन्ह्यांत त्याचे इतर कोण सहकारी आहेत याचा पोलीस तपास करत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी सांगितले.