मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ डिसेंबर २०२४
मुंबई, – कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांची विक्रीचा गुन्हे शाखेच्या सीबी नियंत्रण कक्षाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. शिवडीतील एका खाजगी कंपनीत छापा टाकून कंपनीचा मालक जिगर चंद्रकांत सावला याला पोलिसांनी अटक केली. जिगर हा कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर नवीन एक्सपायरी डेटसह इतर तपशील टाकून या खाद्यपदार्थांची विक्री करुन संबंधित कंपनीसह ग्राहकांची फसवणुक करत असल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कालबाह्य झालेल्या अमूल, ब्रिटानिया, पेप्सी कंपनी आणि इतर विविध प्रकारच्या नामांकित पॅक केलेल्या खाद्यपदार्थांची पुन्हा डेट केलेले आणि इंकजेट प्रिंटर वापरुन लेबल लावलेल्या खाद्यपदार्थांची मुंबईतील विविध किरकोळ दुकानातून विक्री होत आहे. अशा प्रकारे कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांची विक्री करुन आरोपी संबंधित कंपनीसह ग्राहकांची फसवणुक करत असल्याची माहिती सीबी कंट्रोलच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्यांनी शिवडीतील जवाहर कंपाऊंड, गाला क्रमांक चार-ए मधील अस्तर मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोदामामध्ये छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी अमूल आणि पेप्सी कंपनीच्या नामांकित कालबाह्य झालेल्या खाद्यपदार्थांचे पॅकेटचा साठा जप्त केला. त्यात अमूल आणि पेप्सी कंपनीच्या विविध उत्पादनांची कालबाह्य झालेले अमूल तूप, बासुंदी, जिरा टोस्ट, कुकीज, चॉकलेट, अमूल कॉफी, पेप्सी कंपनीचे लेज चिप्स आदी ८ लाख ७८ हजार ५५६ रुपयांच्या फ्रुड पॅकेटच्या समावेश होता.
या पॅकेटचे एक्सपायरी डेट, बॅच क्रमांक आणि इतर तपशील पातळ करुन त्याजागी नवीन एक्सपायरी डेट आणि इतर तपशील टाकण्यात आला होता. त्यानंतर ते पॅकेट मुंबई शहरातील विविध किरकोळ दुकानात विक्रीसाठी पाठविले जात होते. यावेळी तिथे असलेल्या कंपनीचा मालक जिगर सावला याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हा प्रकार उघडकीस येताच पोलीस हवालदार दाभोलकर यांच्या तक्रारीवरुन रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांत जिगर सावलाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक करुन पुढील चौकशीसाठी संबंधित पोलिसांच्या स्वाधीन केले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर जिगर सावला याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.