मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ डिसेंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील एका फ्लॅटसह सांताक्रुजमध्ये एका हॉटेलमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी पळून गेलेल्या दोन आरोपींना बोरिवली आणि सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. राजू श्रीकांत मलिक आणि हरिओम ऊर्फ भडकू शिवकुमार विश्वकर्मा अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात ाअले आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
रोहन सुनिल म्हात्रे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील गोराई, आशा-छाया सहकारी सोसायटीच्या वन प्लस वन रुममध्ये राहतात. एका खाजगी कंपनीत तो सध्या कामाला आहे. २७ नोव्हेंबरला ते त्यांच्या पत्नीसोबत पहिल्या मजल्यावरील तर त्यांची आई खालच्या हॉलमध्ये झोपली होती. सकाळी त्याच्या पत्नीला हॉलमधील कपाट उघडले दिसले. तिने आतील सामानाची पाहणी केली. त्यात विविध सोन्याचे दागिने, बँकेचे डेबीट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, साडेआठ हजाराची कॅश असा सुमारे पावणेआठ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येताच रोहन म्हात्रे याने बोरिवली पोलिसांत घरफोडीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी हरिओम विश्वकर्मा याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे सांगितले.
दुसर्या घटनेत राजू श्रीकांत मलिक या कॅशिअरला सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. राजन बल्बी कारकी हे सांताक्रुज येथे राहत असून ते बोरा बोरा हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहे. या हॉटेलमध्ये ५० कर्मचारी कामाला असून राजू हा गेल्या एक महिन्यांपासून तिथे कॅशिअर म्हणून कामाला होता. दिवसभराची कॅश जमा करुन लॉकरमधून ठेवून तो दुसर्या दिवशी ती कॅश बँकेत जमा करत होता. १० नोव्हेंबरला तो नेहमीप्रमाणे कामावर आला होता. सायंकाळी तो कामासाठी बाहेर गेला आणि परत आला नाही. त्याला संपर्क साधल्यानंतर त्याचा मोबाईल बंद येत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच राजन कारकी यांनी लॉकरची पाहणी केली होती. यावेळी त्यांना लॉकरमधील सुमारे चार लाखांची कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले. ही कॅश राजू मलिकने चोरी करुन पलायन केल्याची खात्री होताच त्यांनी सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या राजू मलिकला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.