मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ डिसेंबर २०२४
मुंबई, – दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन इमारतीमध्ये पुन्हा बॉम्बस्फोट घडविण्याची मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने रशियन भाषेत स्फोटकांनी बँकेला उडवून देण्याची धमकी दिल्याने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी धमकी देणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. चालू महिन्यांत रिझर्व्ह बँकेला आलेली ही दुसरी घटना आहे.
गोपाळ पंडित चौहाण हे कल्याणच्या खडकपाडा, गांधारनगरीचे रहिवाशी आहेत. सध्या ते रिझर्व्ह बँकेत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे फोर्ट येथील शहिद भगतसिंग मार्ग, रिझर्व्ह बँकेच्या नवीन इमारतीमध्ये कर्तव्यावर हजर झाले होते. दुपारी दिड वाजता बँकेच्या गर्व्हनर यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज केला होता. त्यात स्फोटकाने भरलेल्या वाहनाने रिझर्व्ह बँकेला उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. या मेलनंतर बँकेच्या वतीने गोपाळ चौहाण यांनी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर धमकीचा मेल पाठविणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी ३५३ (१), ३५१ (३), ३५१ (४) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
काही दिवसांपूर्वीच एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलत असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने रिझर्व्ह बँक करण्यास सांगितले होते. बँक बंद न केल्यास स्फोटकांनी बँक उडवून देण्याची धमकी दिली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाहीतर तोवर गुरुवारी सकाळी दुसर्या धमकीचा मेल आला होता. या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे. हा मेल कोणी पाठविला, तो कोठून आला, यापूर्वीही आलेल्या धमकीच्या मेलशी त्याचा काही संबंध आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.