मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ डिसेंबर २०२४
मुंबई, – नाकाबंदीदरम्यान रिक्षाची तपासणी केली म्हणून एका पोलीस हवालदारावर रिक्षाचालकाने हल्ला केल्याची घटना पवई परिसरात घडली. त्यात पोलीस हवालदार चिंतामण सखाराम बेलकर यांना किरकोळ दुखापत झाली होती. शिवीगाळ करुन पेव्हर ब्लॉकने हल्ला करणार्या रिक्षाचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून नंतर त्याला पवई पोलिसांनी अटक केली. मनोज बच्चूलाल चव्हाण असे या २८ वर्षांच्या रिक्षाचालकाचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना गुरुवारी मध्यरात्री सव्वादोन वाजता अंधेरीतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, साऊथ बॉंण्डवर घडली. चिंतामण सखाराम बेलकर हे विक्रोळीतील कन्नमवारनगर, राजमाता सोसायटीमध्ये राहतात. ते मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असून सध्या त्यांची नेमणूक पवई पोलीस ठाण्यात आहे. गुरुवारी रात्री उशिरा पवई पोलिसांचे एक विशेष पथक जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, साऊथ बॉंण्डवर नाकाबंदी करत होते. यावेळी संशयित वाहनांची तपासणी करत असताना पोलीस पथकाने एका रिक्षाचालकाला थांबविले होते. रिक्षाची तपासणी करण्यावरुन रिक्षाचालक मनोज चव्हाणने चिंतामण यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यावर मागून पेव्हर ब्लॉकने दुखापत केली होती.
या घटनेनंतर मनोज चव्हाण याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांशी हुज्जत घालून शिवीगाळ करणे, पेव्हर ब्लॉकने हल्ला करुन दुखापत करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. चिंतामन बेलकर यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले. मनोज हा भिवंडीतील कळेशी काल्हेर गाव, शिवकृपा अपार्टमेंटचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.