मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ डिसेंबर २०२४
मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) – शारीरिक सुखाची मागणी करुन एका सोळा वर्षांच्या मुलीशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग झाल्याचा प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच २० वर्षांच्या तरुणाला माटुंगा पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बळीत मुलगी गोवंडी परिसरात राहत असून कॉलेजमध्ये शिकते. अरबाज नावाचा आरोपी याच परिसरात राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. तिचा अरबाज हा नेहमीच पाठलाग करत होता. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. बुधवारी ११ डिसेंबरला दुपारी तीन वाजता ती माटुंगा येथील फाईव्ह गार्डन परिसरातून जात होती. यावेळी अरबाजने तिचा पाठलाग केला होता. काही वेळाने तो तिच्याजवळ आला आणि त्याने तिचा हात पकडून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. यावेळी तिने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने तिच्याशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितल्यानंतर दुसर्या दिवशी तिने माटुंगा पोलीस ठाण्यात अरबाजविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. बुधवारी घडलेल्या या घटनेने गोवंडीतील स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.