मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ डिसेंबर २०२४
मुंबई, – घरी जाणार्या एका २० वर्षांच्या तरुणीशी अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दिनदयाल मोतीराम सिंग या २७ वर्षांच्या आरोपीस उत्तरप्रदेशातून गावदेवी पोलिसांनी अटक केली. गुन्हा घडल्यानंतर अटकेच्या भीतीने दिनदयाल हा उत्तरप्रदेशला पळून गेला होता, अखेर पंधरा दिवसानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनदयाल हा विकृत स्वभावाचा असून त्याने सोफिया कॉलेज परिसरातील वाहन पार्किंग तळावर कॉलेज तरुणीना पाहून अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली आहे.
२० वर्षांची तक्रारदार तरुणी ही ३० नोव्हेंबरला टॅक्सीने प्रवास करत होती. कंबाला हिल बसस्टॉपवर आल्यानंतर तिला तिचा एक तरुण पाठलाग करत असल्याचे दिसून आले. मात्र तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. काही वेळानंतर त्याने तिच्याशी अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग केला आणि तेथून पळून गेला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली होती. घडलेला प्रकार तिने तिच्या मित्राला सांगितला. त्यानंतर या मित्राने हा प्रकार सोशल मिडीयावर अपलोड केला होता. या व्हिडीओची गावदेवी पोलिसांनी गंभीर दखल घेत या तरुणीची जबानी नोंदवून आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आरोपीचे नाव दिनदयाल असल्याचे उघडकीस आले. तो सायन परिसरात राहत असल्याने एक टिम तिथे पाठविण्यात आली होती. यावेळी त्याचा भाऊ जयप्रकाश सिंग याची पोलिसांनी चौकशी केली असता दिनदयाल हा उत्तरप्रदेशात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर गावदेवी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने उत्तरप्रदेशातून दिनदयालला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच या तरुणीचा विनयभंग केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर रविवारी दुपारी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनदयाल हा मूळचा उत्तरप्रदेशातील आग्रा, जगनेरच्या बमनाईतला गावचा रहिवाशी आहे. गेल्या दहा वर्षांपासून तो सायन-कोळीवाडा परिसरात राहत होता. सध्या तो कुलाबा, ग्रँटरोड, ब्रिजकॅण्डी परिसरात फरसाण विक्रीचे काम करत होता. गुन्ह्यांच्या दिवशी तो घरी जात होता. यावेळी त्याने तक्रारदार तरुणीशी अश्लील कृत्य करुन तिचा विनयभंग केला होता. चौकशीदरम्यान त्याने सोफिया कॉलेज परिसरातील वाहन पार्किंग तळावर थांबून अश्लील कृत्य केल्याची तक्रार काही कॉलेज तरुणींनी केली आहे. त्याने तक्रारदार तरुणीसह इतर तरुणीसह महिलांसोबत अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्याची लवकरच ओळख परेड होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.