लहान बाळांची विक्री करणार्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश
आठ महिलांसह नऊजणांना अटक; बाळाची सुखरुप सुटका
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ डिसेंबर २०२४
मुंबई, – लहान बाळांची विक्री करणार्या एका आंतरराज्य टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सात महिलांसह आठजणांना पोलिसांनी अटक केली आहे. मनिषा सनी यादव, मदिना ऊर्फ मुन्नी इमाम चव्हाण, तैनाज शाहिन चौहाण, बेबी मोईनुद्दीन तांबोळी, सुलोचना सुरेश कांबळे, मिरा राजाराम यादव, योगेश सुरेश भोईर, रोशनी सोनूद घोष आणि संध्या अर्जुन राजपूत अशी या नऊजणांची नावे आहेत. या आरोपींनी विक्री केलेल्या बाळाची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने गुरुवार १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील मनिषा यादवने स्वतच्या बाळाची विक्री केल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रमिला उथप्पा पवार ही महिला सायन-माहीम लिंक रोड, राजीव गांधी नगर परिसरात राहत असून ती घरकाम करते. मनिषा ही तिची सून असून ती कचरा वेचण्याचे काम करते. मनिषाला सव्वा महिन्यांची एक मुलगी असून तिने तिच्या मुलीला बंगलोर येथे एका व्यक्तीला विकले आहे अशी माहिती प्रमिला पवारने माटुंगा पोलिसांना दिली होती. या माहितीनंतर तिने तिच्या सूनेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत माटुंगा पोलिसांना तपास करुन बाळाची सुटका करुन दोषी महिलेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर, केशव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी, विनोद पाटील, प्रविण पाटील, सुनिल चव्हाण, ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, मदने, पोलीस शिपाई बहादुरे, महिला पोलीस शिपाई सोनाली भोपळे, अश्विनी शेंडकर यांनी तपास सुरु केला होता.
तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी उल्हासनगर, सुरत, वडोदरा आणि कर्नाटकच्या सिरसी शहरात छापे टाकले होते. या कारवाईत मनिषा यादवला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या चौकशीत तिने तिला तिच्या मुलीला विक्री करण्यास इतर काहीजणांनी मदत केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर पोलिसांनी सुलोचना कांबळे, मिरा यादव, योगेश भोईर, रोशनी घोष, संध्या राजपूत, मदिना चव्हाण, तैनाज चौहाण आणि बेबी तांबोळी या आठजणांना अटक केली होती. चौकशीदरम्यान लहान बाळांची विक्री करणारी ही एक आंतरराज्य टोळी आहे. या टोळीनेच मनिषाच्या मुलीच्या विक्रीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. यातील सुलोचना आणि तैनाज या दोघीही दादर व वडोदरा येथे राहत असून घरकाम करतात. मिरा ही आजारी लोकांची सेवा करत असून ती ठाण्यातील दिवा परिसरात राहते. शिवडी येथे राहणारा योगेश हा एजंट म्हणून काम करत होता. मदिना, रोशनी, बेबी आणि संध्या या मिरज, कल्याण, वडोदरा व उल्हासनगर येथे राहत असून लग्न जुळविण्याचे काम करतात.
या टोळीने विक्री केलेल्या मनिषाच्या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. अटकेनंतर नऊ आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने इतर काही लहान बाळांच विक्री केली आहे. प्रत्येक बाळामागे किती रुपयांचा व्यवहार झाला, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत. या आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.