बुद्ध विहारात सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाकडून चोरी
गुन्हा दाखल होताच मुलाकडून सर्व मुद्देमाल हस्तगत
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ डिसेंबर २०२४
मुंबई, – वांद्रे येथील प्रसिद्ध बुद्ध विहारात एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन काही तासांत चोरीप्रकरणी आरोपी मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चोरीची कबुली देताना या मुलाने चोरीचा सर्व मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केले. तो अल्पवयीन असल्याने त्याला त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करुन नोटीस बजाविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी बुद्ध विहारात झालेल्या चोरीच्या घटनेने भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
ही घटना शनिवारी रात्री दहा ते रविवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान वांद्रे येथील खेरवाडी, अमृतनगर, आम्रपाली बुद्ध विहारात घडली. याच परिसरात उदय वामन शिंदे हे कंत्राटदार त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. तिथे आम्रपाली नावाचे एक प्रसिद्ध बुद्ध विहार आहे. रविवारी सकाळी साडेसहा वाजता बुद्ध विहारात चोरी झाल्याचे काही स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले होते. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने तिथे प्रवेश करुन भगवान गौतम बुद्धाची पंचधातूची मूर्ती, पितळाच्या दोन फुलदाण्या आणि पितळेची एक प्लोट असा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच उदय शिंदे यांनी निर्मलनगर पोलिसांना चोरीची माहिती दिली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
बुद्ध विहारात झालेल्या चोरीच्या घटनेने स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे वरिष्ठांनी या घटनेची गंभीर दखल घेत निर्मलनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. गुन्हा दाखल होताच एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला होता. तो अल्पवयीन असल्याने त्याला नंतर त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याला चौकशीसाठी नंतर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे.