मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ डिसेंबर २०२४
मुंबई, – पहाटेच्या वेळेस घातक शस्त्रांचा धाक दाखवून भाजी विक्रेत्यांना लुटणार्या एका टोळीचा माटुंगा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी घातक शस्त्रांसह त्रिकुटास पोलिसांनी अटक केली आहे. अरबाज नासीर शेख ऊर्फ बाबूलाल, मोहम्मद रफिक अस्लम सिद्धीकी आणि फैजान हबीब जमादार अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी एक चाकूसह सहा हजाराची कॅश जप्त केली आहे. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
माला परशुराम गिरी हे वडाळा परिसरात राहत असून भाजी विक्रेता म्हणून काम करतात. ते सकाळी दादर मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी जातात. शनिवारी पहाटे पाच वाजता ते त्यांचा सहकारी सोमनाथ महादेव लोंढे यांच्यासोबत माटुंगा येथील फाईव्ह गार्डन येथून दादरच्या दिशेने जात होते. यावेळी एका स्कूटीवरुन तीनजण आले आणि त्यांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पैशांची मागणी करुन त्यांनी दोन्ही भाजी विक्रेत्याकडील सुमारे ३० हजाराची कॅश घेऊन पलायन केले होते. घडलेला प्रकार माटुंगा पोलिसांना सांगून त्यांनी तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत माटुंगा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मदने, पोलीस उपनिरीक्षक माळी, निकिता नारणे, पोलीस हवालदार घुगे, निकम, पोलीस शिपाई घाडगे, देशमाने, मेटकर, तोडासे, उंडे, आमदे, सजगणे, साळुंखे यांनी तपासाला सुरुवात केली होती. आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने २४ तासांत पळून गेलेल्या तिन्ही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या तिघानीच ही रॉबरी केल्याचे तपासात उघडकीस आले. यातील अरबाज हा रस्त्यावर कपडे विक्रीचे, मोहम्मद रफिक डिलीव्हरी बॉय तर फैजान हा मोबाईल कव्हर विक्रेता म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.